कोरोनाच्या तिस-या लाटेतून सुटका होत महिना उलटत नाही तोच कोरोनाचे नवे दोन विषाणू मुंबईत दाखल झाले आहेत. कापा आणि एक्सई हे नवे दोन विषाणू मुंबईतील दोन रुग्णांमध्ये आढळल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. ही माहिती कोरोना विषाणूंच्या नमुन्यांच्या (जनुकीय अहवाल) ११व्या अहवालातून पालिकेने प्रसिद्ध केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. या अकराव्या अहवालात २३० नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात २२८ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले. ओमायक्रोन विषाणूचे ९९.१३ टक्के रुग्ण होते.
( हेही वाचा : कोरोनाचा नवा विषाणू एक्सई मुंबईत पोहोचला )
काय आहे मुंबई महानगरपालिकेचा जनुकीय अहवाल
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २३० रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २३० नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष जाहीर करण्यात येत आहेत.
२३० रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण
• ० ते २० वर्षे वयोगट – ३१ रुग्ण (१३ टक्के)
• २१ ते ४० वर्षे वयोगट – ९५ रुग्ण (४१ टक्के)
• ४१ ते ६० वर्षे वयोगट – ७२ रूग्ण (३१ टक्के)
• ६१ ते ८० वयोगट – २९ रुग्ण (१३ टक्के)
• ८१ ते १०० वयोगट – ३ रुग्ण (१ टक्के)
कोविड विषाणू उपप्रकारानुसार २३० बाधित रुग्णांचे वर्गीकरण
• ओमायक्रॉन – २२८ रुग्ण (९९.१३ टक्के)
• कापा व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)
• एक्सई व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)
२३० पैकी २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
• पहिला डोस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.
• दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी फक्त ९ जण रुग्णालयात दाखल.
• लसीचा एकही डोस न घेतलेले १२ जण रुग्णालयात दाखल.
• रुग्णालयात दाखल एकूण २१ रुग्णांपैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही.
एकूण २३० संकलित नमुन्यांपैकी फक्त एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू पोटाशी संबंधित विकारामुळे मृत्यू झाला असल्याने त्याची कोविड-इतर मृत्यू (Covid Other death) अशी नोंद करण्यात आली आहे. या मृत ४७ वर्षीय महिलेने कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस घेतल्या होत्या.
- मास्क वापरण्याचे पालिकेचे आवाहन
- स्वच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरा.
- सुरक्षित अंतर राखा, हातांची स्वच्छता राखा
- लसीकरण पूर्ण करा