शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मंगळवारी ईडीने केलेल्या कारवाईनंतर ही कारवाई राजकीय सूडातून करण्यात आली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर बुधवारी राज्यसभेमध्ये नव्या फौजदारी प्रक्रिया(ओळख) विधेयकावर बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
या नव्या कायद्याचा तपास यंत्रणांकडून गैरवापर होण्याची शक्यता त्यांनी राज्यसभेमध्ये वर्तवली. तेव्हा त्यांच्या भाषणाची वेळ संपल्याने राज्यसभेच्या तालिका अध्यक्षांनी त्यांना खाली बसवले. त्यामुळे राऊतांचा आवाज राज्यसभेतही बंद करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
(हेही वाचाः राऊतांवरील कारवाईविषयी पंतप्रधानांना कळवले, पण…काय म्हणाले शरद पवार?)
काय म्हणाले संजय राऊत?
फौजदारी प्रक्रिया विधेयकावर बुधवारी राज्यसभेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यावेळी संजय राऊत सभागृहात बोलत होते. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सरकारकडून हे विधेयक आणण्यात आले आहे. पण याआधीही अफज़ल गुरू, कसाब यांना फाशी देण्यात आली. तरीही 102 वर्ष जूना कायदा बदलण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. अलीकडे देशात केंद्र सरकारच्या विरोधात बोलणा-यांना गुन्हेगार ठरवण्यात येत आहे. तपास यंत्रणांना राक्षस बनवण्यात येत आहे. त्यापेक्षा देशात मार्शल कायदा लावा, अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली. या कायद्याचा गैरवापर होणार नाही, असं आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पण आमच्या डोळ्यात डोळे घालून ही गोष्ट केंद्र सरकार सांगू शकतं का, असा सवाल राऊतांनी यावेळी केला.
(हेही वाचाः शिवसेना आता मांजरीचा आवाज काढण्याच्या सुद्धा लायकीची राहिली नाही, राणेंचा घणाघात)
माईक झाला बंद
यानंतर विधेयकावर आपलं मत मांडण्याची संजय राऊत यांची वेळ संपल्याने त्यांना राज्यसभेचे तालिका अध्यक्ष सुरेंद्र सिंह नागर यांनी खाली बसण्यास सांगितले. त्यानंतरही संजय राऊत सभागृहात बोलत होते. पण फौजिया खान यांना आपलं मत मांडण्यास तालिका अध्यक्षांनी सांगितल्यानंतर राऊतांचा माईक बंद करण्यात आला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन- राऊत
यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणांच्या दुरुपयोगावरुन मला राज्यसभेत बोलू दिले नाही. माझ्या भाषणावेळी मला थांबवण्यात आले. यावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन होत असल्याचे दिसते. यावरुन मी घाबरतो का माझा आवाज बंद करणारे घाबरतात हे कळते. केंद्र सरकार आपला आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे. पण तरीही आम्ही बोलायचं थांबणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः राऊतांबाबत राज ठाकरेंची ती भविष्यवाणी खरी होणार? वाचा काय म्हणाले होते)
Join Our WhatsApp Community