राऊतांची देहबोली बरेच काही सांगून गेली!

111

रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक शैलीत विरोधकांवर हल्लाबोल करणारे संजय राऊत जसे अडचणीत येऊ लागले, तसा त्यांच्या भाषेत बदल होऊ लागला. पत्रकार परिषदांमध्ये ते जाहीरपणे शिव्या देऊ लागले. ५ एप्रिल २०२२ रोजी ईडीने राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर माध्यमांसमोर येणाऱ्या राऊतांची देहबोली बरेच काही सांगू लागली आहे. आता माझी वेळ आली, याची बहुदा त्यांना कल्पना आली असावी आणि यामुळेच आलेल्या वैफल्यातून त्यांच्या भाषेची पातळी आणखीच घसरली आहे. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळही संपत आला आहे. ईडीने कारवाईसाठी निवडलेली ही वेळ पाहता राऊत एकाकी पडल्याचे दिसते आहे.

नैराश्यातून ते शिवराळ भाषा

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात ते माझ्याविषयी बोलले असे सांगून आता माझ्यावर काही तणाव नाही, असे दाखवण्याची केविलवाणी धडपड ते करत असले, तरी वस्तुस्थिती काही वेगळीच असू शकते याची कल्पना सगळ्यांनाच आहे. याला कारणही तसे आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा कारवाईला ईडीने सुरुवात केली, तेव्हाही शरद पवार पंतप्रधानांना भेटले होते. आणि त्यानंतर देशमुख यांना आता अटक होणार नाही असे आराखडे बांधले जात होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. देशमुख तुरुंगात गेले आणि अजूनही बाहेर आलेले नाहीत. हे पाहता या घटनेची पुनरावृत्ती राऊतांच्या बाबतीत होणार नाही ना, अशीही चर्चा आहे. राऊतांवर कारवाई झाल्यानंतर ते नरमाईची भूमिका घेतील, असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात ते आणखी आक्रमक झाल्याचे स्वतःला सादर करत आहेत. मात्र यातील कृत्रिमता लपून राहण्यासारखी नाही. त्यांच्या देहबोलीतून दिसणारा तणाव बरेच काही सांगून जात आहे. याच नैराश्यातून ते शिवराळ भाषा वापरत आहेत.

धडपड व्यर्थ ठरली

आपल्यावर कारवाई होऊ शकते याची चाहूल लागल्यानंतर आक्रमक होऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला होता. शिवसेना भवनमधील पत्रकार परिषद असो किंवा ईडी कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचा इशारा असो. राऊतांनी विरोधकांवर दबाव निर्माण करून आपल्यावरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांची ही धडपड व्यर्थ ठरली. आता ईडीने केलेल्या कारवाईमुळे राऊतांच्या अस्तित्वालाच मोठा धक्का बसला आहे. त्यातून सावरण्याची धडपड करत असताना ज्या पद्धतीने ते व्यक्त होत आहेत त्यात त्यांच्यावरील तणाव आणि आता पुढे काय याची चिंता हे दोन्ही त्यांना लपवता आलेले नाही. चेहरा, भाव फार बोलके असतात, ते ओठांच्या बडबडींपेक्षा बरेच काही सांगून जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.