गेल्या पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होती म्हणून दहा हजारांहून अधिक कर्मचारी आझाद मैदानात आले होते. मात्र कामावर रुजू होण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी परतीची वाट धरत कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी आझाद मैदानात दहा हजारांहून अधिक हजर असलेले कर्मचारी बुधवारी केवळ तीन हजारांवर होते. यावरून असे लक्षात येते की, पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संपातून माघार घेत कर्मचारी माघारी परतले आहेत.
२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा, न्यायालयाचा आदेश
एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने राज्यातील आगारातून पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू झालेली नाही. एसटीअभावी शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसटी नसल्याने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६ हजार एसटी असून अवघ्या ४,९०० बस धावत आहेत. त्यांच्या १४ हजार फेऱ्या होत असल्याची माहिती समोर येत आहे. यातून दिवसाला दहा लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र तुलनेत ही सेवा अपुरी आहे. गुरूवारी उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानंतर रुजू न झाल्यास प्रशासनाला कारवाईची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी डेपोमध्ये रुजू होण्यासाठी परत गेले आहेत.
(हेही वाचा – २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा, एसटी कामगारांना न्यायालयाचा आदेश)
आझाद मैदानात संपकऱ्यांची तब्येत खालावली
बुधवारी, आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या एसटी महामंडळाच्या ५१ संपकरी कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली होती.या ५१ संपकरी कर्मचाऱ्यांची तब्येत खालावल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे कर्मचारी साखळी उपोषण करीत आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत रोज सकाळी मैदानातील रुग्णवाहिकेतील डॉक्टरांकडून संपकरी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांना मंगळवारी वाढलेला उष्मा आणि उपोषणामुळे चक्कर येणे, बेशुद्ध होणे, रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले.
Join Our WhatsApp Community