मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या विधानावरुन पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे नाराज होते. आता त्यांना हीच नाराजी भोवल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशावरुन मोरेंची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
साईनाथ बाबर यांच्यावर जबाबदारी
मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन माहिती देत, पक्षाने पुणे शहराध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याची निवड झाल्याची घोषणा केली आहे. ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!
( हेही वाचा: मोदी-पवार भेटीत काय झालं? अजित पवारांनी सांगितलं पूर्ण संभाषण )
काय म्हणाले होते वसंत मोरे
राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांवरुन केलेल्या भाषणानंतर वसंत मोरे यांनी म्हटले की, माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नाही. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी म्हटले. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. असे वसंत मोरे म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community