‘हिंमत असेल तर नजरेला नजर भिडवा’, शहांचे भर सभागृहात राऊतांना आव्हान

121

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप राऊत यांनी बुधवारी थेट राज्यसभेत केला. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारा आम्ही उत्तरं द्यायला तयार आहोत, असं थेट आव्हान शहा यांनी संजय राऊत यांना केलं आहे.

शहांचे आव्हान

फौजदारी प्रक्रिया विधेयकावर बुधवारी राज्यसभेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यावेळी संजय राऊत सभागृहात बोलत होते. अलीकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणा राक्षस झाल्या आहेत. त्यामुळे नव्या फौजदारी विधेयकातील तरतुदींचा केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे गैरवापर होणार नाही, हे आमच्या नजरेला नजर भिडवून केंद्र सरकारला सांगता येईल का, असा सवाल राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केला. त्याला गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले. नजरेला नजर भिडवून आम्हाला प्रश्न विचारण्याची तुम्ही हिंमत दाखवली तर आम्ही देखील तुमच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ, असे थेट आव्हान अमित शहा यांनी राऊतांना केले. आमच्या मनात चोरी नाही, ज्या गोष्टी कायदेशीर असतात, त्याच आम्ही करतो. अशा शब्दांत शहा यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

(हेही वाचाः “राऊतांनी मला ‘सामना’ कार्यालयात धमकावले अन् 25 लाख घेतले”)

काय म्हणाले होते राऊत?

गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सरकारकडून हे विधेयक आणण्यात आले आहे. पण याआधीही अफज़ल गुरू, कसाब यांना फाशी देण्यात आली. तरीही 102 वर्ष जूना कायदा बदलण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. अलीकडे देशात केंद्र सरकारच्या विरोधात बोलणा-यांना गुन्हेगार ठरवण्यात येत आहे. तपास यंत्रणांना राक्षस बनवण्यात येत आहे. त्यापेक्षा देशात मार्शल कायदा लावा, अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली. या कायद्याचा गैरवापर होणार नाही, असं आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पण आमच्या डोळ्यात डोळे घालून ही गोष्ट केंद्र सरकार सांगू शकतं का, असा सवाल राऊतांनी यावेळी केला.

(हेही वाचाः मोदी-पवार भेटीत काय झालं? अजित पवारांनी सांगितलं पूर्ण संभाषण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.