घाई, गडबडीत नागरिक कित्येकदा रिक्षा, ओला-उबेरवर अवलंबून असतात. अशावेळीच कित्येकदा रिक्षा चालक नागरिकांचं भाडं नेमकं त्यावेळी नाकारतात आणि नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. भाडे नाकारणे, पैशांसाठी कटकट करणे आणि प्रवाशांशी विनाकारण वाद घालण्याच्या सवयींची आता ओला आणि उबेर चालकांनादेखील सवय झाली आहे. सुरुवातीला प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सीचालकांसोबत यासाठी वाद घालावा लागत होता. मात्र यामध्ये आता ओला आणि उबेरसारख्या सेवांचीही भर पडल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाड्याचे ठिकाण सांगितल्यानंतर संबंधित ठिकाणचे भाडे ओला-उबेर चालक रद्द करत असल्याची तक्रार ७९ टक्के प्रवाशांनी केली असून रिक्षाप्रमाणेच ओला-उबेर चालकांची मुजोरी समोर आली आहे.
(हेही वाचा – IT कडून धडक कारवाई! यशवंत जाधवांच्या 41 मालमत्ता जप्त)
यासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले, लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणाअंती ॲप टॅक्सी प्रवाशांनी त्यांच्या सेवांसह अनेक तक्रारी मांडल्या असून, हे सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावर करण्यात आले अहे.
असे झाले सर्वेक्षण
या सर्वेक्षणात देशातील ३२४ जिल्ह्यांतील ६५ हजार प्रवासी सहभागी झाले होते. या सर्वेक्षणानुसार, गेल्या १२ महिन्यांत ५८ टक्के ॲप टॅक्सी ग्राहकांनी टॅक्सीने प्रवास केला. प्रवास सुखाचा व्हावा म्हणून या सेवा वापरल्या जात असल्या तरी याचा फार काही चांगला अनुभव प्रवाशांना आलेला नाही. चालकांकडून भाडे रद्द करण्याच्या समस्या कायम असल्याचे ७१ टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे. आपल्याकडून प्रवासाचे अधिकचे पैसे घेतल्याचे ४५ टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे. काही ग्राहकांनी तर चालकांकडून दादागिरीची भाषा वापरली जात असल्याची प्रतिक्रिया नोंदविली असल्याचे या झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
सर्वेक्षणानुसार काय आल्यात तक्रारी?
करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून प्रवाशांनी केलेल्या तक्रारी पुढीलप्रमाणे, चालकांनी भाडे रद्द केले, चालकांना डिजिटल पेमेंटऐवजी रोख रक्कम हवी असा आग्रह, दीर्घ काळ प्रतीक्षा करायला लावणे, चालकाची गैरवर्तणूक आणि अत्याधिक वाढीव शुल्क.
का नाकारली सेवा?
- ४७% ग्राहकांनी ड्रायव्हर्सनी राइड रद्द केल्याचे सांगितले.
- ३२% ग्राहकांना सर्च प्राइसिंगबाबत समस्या आली.
- ९% ग्राहकांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली.
- ४% ग्राहकांनी शुल्कामुळे सेवा रद्द केली.