पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, सीएनजी, पीएनजीने महागाईचा उबंरठा ओलांडल्यानंतर आता वीज दरवाढीचाही झटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. वाढता उकाडा आणि उद्योगात तेजी आल्याने देशात विजेच्या मागणीत ३८ टक्क्यांची वाढ झाल्याने खरेदीची किंमत १३ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्र वीज नियामक आयोग नवीन नियामक आराखडा आणणार आहे. जर या आराखड्याला मंजुरी मिळाली तर येणाऱ्या काळात मुंबईमध्ये वीज महाग होण्याची शक्यता असल्याचे गुरूवारी वर्तवण्यात आले होते.
(हेही वाचा – मुंबईकरांना लवकरच बसणार वीज दरवाढीचा शॉक?)
इंडियन एनर्जी एक्स्चेंजवर विजेची सरासरी किंमत वाढून ८.२३ रुपये प्रतिकिलोवॉट तासावर पोहोचली आहे, जी मार्च २०२१ मध्ये ४.२० रुपये प्रतिकिलोवॉट होती. २००९ नंतर ही सर्वात अधिक खरेदी किंमत आहे. महाग वीज खरेदी करावी लागत असल्याने वीज वितरण कंपन्या त्याचा बोझा ग्राहकांवर लादू शकतात. सध्या तरी वीज कंपन्यांनी तात्काळ दरवाढीचे संकेत दिले नसले तरी मागणी वाढल्याने भारनियमन लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आणि एमईडीसीएलसारख्या वीज कंपन्यांचा दैनंदिन खर्च वाढला आहे. दैनंदिन भांडवली खर्चासाठी गुंतवणुकीची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर एक नवा आराखडा नियामक आयोगाने तयार केला आहे.
देशावर ओढावलं कोळसा संकट!
देशात विजेची मागणी वाढली असताना भारतात सलग दुसऱ्या वर्षी कोळसा पुरवठ्याचे संकट ओढावल्याचे समोर आले आहे. कोल इंडियाने यामुळे औद्योगिक कंपन्यांच्या कोळसा पुरवठ्यावर निर्बंध आणले असून, वीज प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे. सरकारी मालकीच्या खाण कपन्यांनी उद्योगांना दैनंदिन पुरवठा २७५,००० टनांपर्यंत मर्यादित केला. हे प्रमाण १७ टक्क्यांनी कमी आहे. कोळसा आयातही महाग झाल्याने अनेक उद्योजक चिंतित असल्याच सांगितले जात आहे.
कशापासून तयार होते देशात वीज
- कोळसा – ५३.३ टक्के
- सौरऊर्जा – १२.७ टक्के
- पाण्यापासून – ११.८ टक्के
- पवन ऊर्जा – १०. २ टक्के
- गॅस- डिझेल – ६.४ टक्के
- अणुऊर्जा – १.७ टक्के
- अन्य- ३.९ टक्के