निवडणूक काळातील साडेचार महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दर स्थिरतेनंतर २२ मार्चपासून पुन्हा इंधन दरवाढ सुरू झाल्याचे दिसत आहे. इंधन दरवाढीचे सत्र कायम असून सध्या राज्यात इंधन दरवाढ अद्याप कायम आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशा ठरवल्या जातात. इंधनाच्या वाढत्या किमती पाहताना तुमच्या मनात नेहमी हा प्रश्न येत असेल, उत्तरासाठी ही बातमी पूर्ण वाचा…
असे पेट्रोलचे दर केले जातात निश्चित
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून असतात. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि दुसरा सरकारी कर. कच्च्या तेलाच्या दरावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसते, परंतु सरकार हा कर आपल्या स्तरावर वाढवू किंवा कमी करू शकते. म्हणजेच गरज भासल्यास सरकारला हा कर कमी करून वाढत्या किंमतीपासून नागरिकांना काहिसा दिलासा देऊन जनतेला त्याचा फायदा मिळवून देऊ शकते. देशात तेल कंपन्या पहिले स्वत:हून किंमत ठरवत नव्हती, हे सरकारी पातळीवरून ठरवले जायचे. मात्र जून 2017 पासून सरकारने पेट्रोलच्या किमतीवरील नियंत्रण काढून घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दैनंदिन चढ-उतारानुसार पेट्रोलचे दर निश्चित केले जातील, असे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची खरेदी बॅरलने केली जाते. एका बॅरलमध्ये सुमारे 162 लिटर तेल असते. सामान्यतः आपण ज्या दराने तेल खरेदी करतो, त्यावर 50 टक्क्यांहून अधिक कर असतो. यामध्ये सुमारे 35 टक्के उत्पादन शुल्क आणि 15 टक्के राज्य व्हॅट किंवा विक्री कराचा समावेश असतो. यामध्ये 2 टक्के कस्टम ड्युटी असून डीलर कमिशनचा देखील यामध्ये समावेश असतो. तेलाच्या आधारभूत किमतीमध्ये कच्च्या तेलाची किंमत आणि ते शुद्ध करण्यासाठी रिफायनरीजचा खर्च समाविष्ट असतो. प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत, कारण राज्यांमध्ये विक्री कर किंवा व्हॅटचा दर 17 ते 37 टक्क्यांपर्यंत असतो.
पेट्रोलियम कसे तयार केले जाते?
पेट्रोलियमची उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी हवेच्या अनुपस्थितीत जमिनीखाली गाडलेल्या प्राणी आणि वनस्पतींपासून झाली आहे. ते मर्यादित संसाधन म्हणून ओळखले जाते. जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात.
भारतात पेट्रोल कुठून येते?
भारतात कच्चे तेल प्रामुख्याने चार देशांमधून येते. यामध्ये इराक, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नायजेरिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश होतो. भारतात आल्यानंतर रिफायनर्सद्वारे कच्च्या तेलापासून पेट्रोल तयार केले जाते.
हे आहेत जगातील तेल उत्पादक देश
जगात अनेक तेल उत्पादक देश आहेत, परंतु जगातील 10 सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांची नावे खालीलप्रमाणे
- अमेरिका
- सौदी अरब
- रशिया
- कॅनडा
- इराण
- इराक
- संयुक्त अरब अमिराती
- चीन
- कुवेत
- ब्राझील