पाच महिन्यांपासून एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शुक्रवारी दुपारी आक्रमक वळण लाभले. एसटी कर्मचा-यांच्या दुरावस्थेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार असल्याचे सांगत, संपक-यांनी पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जोरदार आंदोलन केले. यावेळी संपक-यांनी पवारांच्या घरावर दगडफेक देखील करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून या आंदोलनाची निंदा करण्यात येत आहे. याबाबत आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर अशाप्रकारे करण्यात आलेलं आंदोलन हे समर्थनीय नसल्याचं म्हणत फडणवीसांनी या आंदोलनाचा निषेध केला आहे.
(हेही वाचाः पवारांच्या घरासमोरील आंदोलन, गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी घेतले ताब्यात)
आंदोलन समर्थनीय नाही
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली घटना ही सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजिबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षा देखील फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. @PawarSpeaks
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2022
(हेही वाचाः पवारांच्या बंगल्यावर नेमके धडकले कोण? आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांना थांगपत्ता नाहीच)
सदावर्तेंना घेतले ताब्यात
आंदोलनकर्त्यांकडून शरद पवार यांच्या घरावर दगड आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक भाषणं केल्यामुळेच आंदोलनकारी एसटी कर्माचा-यांनी पवारांच्या घरावर आंदोलन केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांना अटक देखील होऊ शकते अशी शक्यता देखील आता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2022
(हेही वाचाः एसटी संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ)
माझी हत्या होऊ शकते
दरम्यान या कारवाईनंतर सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी हत्या होऊ शकते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात माझ्या पत्नीने तक्रार दिली आहे. आणि मला कोणतीही नोटीस न देता पोलिसांकडून बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः एसटी कर्मचा-यांच्या भावना भडकावणारे कोण? पवारांच्या घराबाहेरील आंदोलनानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया)
Join Our WhatsApp Community