एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी आक्रमक आंदोलन केल्यानंतर आता राजकीय स्तरातून निषेध करण्यात येत आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्ष जे काही करत आहेत हा दळभद्रीपणाचा कळस आहे. ज्यांचे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मोठे योगदान आहे त्यांच्याच घरावर असा हल्ला करणे हे शोभनीय नाही. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्यांना शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी भाजपवर केला.
दरेकरांच्या विधानाने खळबळ
त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज आहे. असे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय आहे. सध्या त्यांची मालमत्ता जप्त झाल्याने ते नैराश्येत आहेत. पोलिसांनी राऊतांवरच लक्ष ठेवावे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात राऊतांचा तर हात नाही ना? याची चौकशी करण्याची गरज असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राज्यातील विरोधी पक्षाचा हा दळभद्रीपणाचा कळस असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता जे आंदोलक रेल्वे स्टेशनला बसले आहेत त्यांच्याकडे एकाच वेळेला प्लॅटफाॅर्म तिकीट आले कुठून? कोणती यंत्रणा यामागे काम करतेय? महाराष्ट्रात तुम्हाला काय घडवायचे आहे?. ज्याप्रकारे भाजपचे नेते या हल्ल्याचे समर्थन करत आहेत, हा त्यांचा हलकटपणा आहे. ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केले तेच आता भाजपमध्ये जाऊन पवारांच्या विरोधात बोलत आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community