गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजीनामा देणार की पोलिसांवर कारवाई करणार?

177

शरद पवार यांच्या घरासोमर एसटी कर्मचा-यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. हे राज्यातील पोलिस यंत्रणांचे अपयश असल्याचं सरकारमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः ‘इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट’, पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राऊतांनी राज्य सरकारलाच फटकारले)

पवारांच्या भेटीनंतर आता गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे पवारांसोबत झालेल्या भेटीत त्यांनी गृहमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी सांगितल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत. तसेच पोलिस अधिका-यांवर देखील कारवाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात राऊतांचा हात?)

पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यातील पोलिस यंत्रणा हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याचे राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना आपल्या निवासस्थानी भेटायला बोलावले होते. यावेळी ते गृहमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला सांगू शकतात किंवा पोलिस यंत्रणांवर कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतात, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या.

(हेही वाचाः ‘आम्ही एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी, पण…’ घरावरील आंदोलनानंतर पवारांची प्रतिक्रिया)

पवारांच्या भेटीनंतर आता गृहमंत्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. जेव्हापासून दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे, तेव्हापासून त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे आता गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा देणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचाः फडणवीस म्हणतात, आंदोलनकारी एसटी कर्मचा-यांचं चुकलंच)

पोलिसांवर निलंबनाची कारवाई?

गृहमंत्र्यांसोबतच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. पोलिस यंत्रणांना या हल्ल्याची माहिती न मिळाल्याने या हल्ल्याचे खापर पोलिसांवर देखील फोडण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीत संबंधित पोलिस अधिका-यांवर देखील निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी शक्यता गृह विभागाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः पवारांच्या घरासमोरील आंदोलन, गुणरत्न सदावर्तेंना अटक)

पोलिसांचे अपयश- अजित पवार

पवारांच्या घरावरील हल्ला म्हणजे एकप्रकारे पोलिसांचे अपयश आहे. ज्यावेळी अशी घटना घडते, त्याची माहिती पोलिस यंत्रणांना माहीत असायला हवी होती. 12 तारखेला बारामतीत जाऊन निदर्शन करण्याचा इशारा याआधी आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यामुळे सर्वांच्याच बाबतीत खबरदारी घेणं हे गरजेचं होतं. शरद पवार हे तर राष्ट्रीय नेते आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी पोलिस यंत्रणेवर टीका केली आहे.

(हेही वाचाः पवारांच्या घरावर दगडफेक, उपमुख्यमंत्री म्हणतात हे पोलिसांचं अपयश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.