श्रीराम हिंदुस्तानचे राष्ट्रपुरुष!

187

श्रीराम आणि श्रीकृष्ण आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्याच बरोबर हे दोघेही हिंदू समाजाची निष्ठाकेंद्रे आहेत. संपूर्ण हिंदुस्थानात श्रीराम जय राम जय जय राम आणि गोपाल कृष्ण भगवान की जय याचा उद्घोष अखंड चालू असतो. आपल्या जीवनाशी श्रीराम एकरूप झाला आहे. आपली अंतिम यात्रा राम नामाचा उद्घोष केला शिवाय पूर्ण होत नाही. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपल्याकडे सर्व ज्ञात आहे. या म्हणीत भगवंताच्या संरक्षण शक्तीवर असलेला विश्वास प्रतिबिंबित होतो. ठेविले अनंते तैसेची रहावे हे संत वचन भक्ताच्या समर्पण वृत्तीचे प्रमाण आहे. चराचरसृष्टीच्या कणात राम भरलेला आहे. हे विधान भगवंताच्या व्यापकतेचे दर्शन घडवते. कोणत्याही सुव्यवस्थित आणि संपन्न राज्यव्यवस्थेसाठी रामराज्य हा एकमेव शब्द उच्चारला जातो.

(हेही वाचा – Ram Navami 2022: जाणून घ्या ‘श्रीरामनवमी’चा इतिहास आणि महत्त्व)

सद्गुणांचे सर्वोच्च शिखर म्हणजे श्रीराम

मर्यादा पुरुषोत्तम राम चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी बारा वाजता तळपत्या उन्हात जन्माला आला. जग आणि जीव ज्यावेळी आधी, व्याधी आणि उपाधी यांनी तप्त होतात त्यावेळी त्यांना शांती आणि सुख देण्यासाठी प्रेम, पावित्र्य आणि प्रसन्नतेचा पुंज असलेला राम जन्माला येतो. प्रत्येकाने राम बनण्याचे ध्येय आपल्या जीवनात बाळगावे त्यासाठी रामालाच आदर्श मानले पाहिजे. यासाठी महर्षी वाल्मिकींनी रामायणासारखा महान चरित्र ग्रंथ लिहिला. सद्गुणांचे सर्वोच्च शिखर म्हणजे श्रीराम!

श्रीराम आपल्या राष्ट्राचे आराध्यदैवत

धर्मपरायण रामाची पालखी खांद्यावर घेऊन त्याचे जीवनभर स्मरण करायचे आहे. राम आपल्या संस्कृतीचा आणि दैवी संपत्तीचा संरक्षक आहे. आसुरी संस्कृतीचा नाश करण्यासाठी राज वैभवाचा त्याग करणारा कोदंडधारी राम आपले राष्ट्रीय दैवत आहे.‌ ज्या दिवशी या श्रीरामाचे विस्मरण हिंदू समाजाला होईल त्यादिवशी हिंदू समाज त्याच्या राष्ट्रासह आणि संस्कृतीसह नष्ट होईल. अशा आशयाचे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काढले आहेत. सावरकरांच्या या उद्गारातच श्रीरामाचे हिंदू समाजातील स्थान स्पष्ट होते. सुवर्णमयी लंका मला आवडत नाही. माझी जन्मभूमी मला स्वर्गा पेक्षा अधिक प्रिय आहे. असे उद्गार काढणारा श्रीराम आपल्या राष्ट्राचे आराध्यदैवत आहे.‌ याचे कारण समजावून सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात.

तोच खरा आपला राष्ट्र दिन!

“श्रीरामांनी लंकेत आपले विजयी पाऊल टाकले आणि हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंतची सर्व भूमी एकछत्री सत्तेखाली आणली. स्वराष्ट्र, स्वदेश निर्मितीचे महान कार्य श्रीरामांनी केले. ज्या दिवशी श्रीरामांचा अश्वमेधाचा विजयी घोडा कोठेही प्रतिरोध न होता अजिंक्य असा अयोध्येला परतला, ज्या दिवशी त्या अप्रमेय अशा प्रभू रामचंद्रांच्या राजभद्राच्या साम्राज्य सिंहासनावर सम्राटाच्या चक्रवर्तित्वाचे श्वेत वस्त्र धरले गेले आणि ज्या दिवशी आर्य म्हणवणाऱ्या नृपश्रेष्ठांनीच नव्हे तर हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनीसुद्धा श्रीरामांच्या सिंहासनाला आपली भक्तिपूर्वक राजनिष्ठा सादर केली. तो दिवस आपल्या खऱ्याखुऱ्या हिंदुराष्ट्राचा, हिंदू जातीचा जन्म दिवस ठरला. तोच खरा आपला राष्ट्र दिन! आर्यांनी आणि अनार्यांनी एकमेकात पूर्णपणे मिसळून एका नवीन अशा संघटित राष्ट्राला त्या दिवशी जन्म दिला.” रावणासारख्या बलाढ्य राक्षसाला ठार मारणारा श्रीराम राम हिंदू राष्ट्राचा सेनानी आहे. अशा या हिंदू राष्ट्राच्या पहिल्या सम्राटाला म्हणजेच श्रीरामांना कोटी कोटी प्रणाम!

दुर्गेश जयवंत परुळकर (व्याख्याते आणि लेखक)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.