राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या देवगिरी बंगल्यावर एक तातडीने बैठक घेतली. या बैठकीत वकील, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह विश्वास नांगरे पाटील देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांच्या घरी यासंदर्भात खलबतं सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.
हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना दोन दिवसांची कोठडी
शुक्रवारी शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर १०९ आरोपींना बाजू मांडण्यासाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी कायदेशीर बाबींमध्ये न्यायालयात मुद्दे स्पष्ट करण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची व सरकारी वकिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्याचे महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणीदेखील उपस्थित आहेत.
(हेही वाचा – ‘सिल्वर ओक’ वरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पोलिसांना होती पूर्वकल्पना!)
या प्रकरणी डीसीपी योगेश कुमारांची बदली
पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यां नुकतीच संतप्त निदर्शने केली होती. या प्रकरणी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यानंतर त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली आहे. पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पवार यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर इतक्या मोठ्या संख्येने जमाव जमतो आणि हल्ला केला जातो, या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती मिळते, मात्र हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांचे अपयश असल्याचा ठपका ठेवला जात आहे.
Join Our WhatsApp Community