‘वारं खूप सुटलंय…’, मनसेच्या टीझरमध्ये बाळासाहेबांची गर्जना!

130

मागील दोन वर्ष राज्यात कोरोनाचा कहर असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सभा, मेळावे, संमेलनांवर बंदी होती. तब्बल दोन वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली आणि जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा उचलला. त्यावरुन त्यांच्यावर सत्ताधा-यांकडून जोरदार टीका करण्यात आली. याच टीकांना उत्तर देण्यासाठी आता राज ठाकरे या 12 एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला मनसेकडून उत्तरसभा असे नाव देण्यात आले असून ठाण्यात होणाऱ्या या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याचे धडाकेबाज टीझरही मनसैनिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या आवाजात दुसरा टीझर 

सोमवारी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत हा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना त्यांनी #उत्तरसभा असे कॅप्शन दिले असून या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवाज वापरल्याचे ऐकायला मिळत आहे. वारं खूप सुटलंय, अणि जे सुटलंय ते आपलंच आहे, असे जारी केलेल्या दुसऱ्या टीझरमध्ये ऐकायला मिळत आहे.

(हेही वाचा – शिवसेनेने आपला झेंडा आणि विचार कधीही बदलले नाहीत, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला)

उत्तर सभेत देणार प्रत्युत्तर

दोन दिवसांपूर्वी देखील मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक टीझर शेअर केला होता. यामध्ये अजित पवार, शरद पवार, संजय राऊत यांनी केलेल्या टीकांना राज ठाकरे आपल्या उत्तर सभेत प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्यांवरील विधानाला विरोध करताना इतके दिवस झोपले होते का, असे म्हटले होते. तर संजय राऊत यांनी शिवतीर्थावरचा भोंगा हा भाजपचा भोंगा असल्याची टीका केली होती. विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी राज ठाकरे मंगळवार 12 एप्रिल रोजी ठाण्यात सभा घेणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. करारा जवाब मिलेगा, असे म्हणत या उत्तर सभेचा खास टीझर मनसैनिकांकडून व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे या हाय व्होल्टेज सभेकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.