सोमय्या अडकले, दरेकर वाचले; उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

139

आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला. मात्र मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

बोगस मजूर प्रकरणी सध्या प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. इतकी वर्ष झाली तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे? त्यामुळे कस्टडीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना ५० हजरांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दरेकरांची दोन वेळा चौकशी केली होती. दरेकरांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. तर, उच्च न्यायालयात सरकार तोंडघशी पडणार असल्याचा दावा दरेकर यांच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे उच्च न्यायालय दरेकरांना दिलासा देणार की, अटकपूर्व जामीन फेटाळणार याकडे लक्ष लागले होते. अशातच सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने दरेकरांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली आहे.

(हेही वाचा – राज्यात उष्माघाताचा कहर! ८ बळी, ९२ जणांवर उपचार सुरू)

प्रवीण दरेकर १९९७ पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.