आधी माझ्या ‘वसंता’ला बोलू द्या! राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत पुण्याला मान

146
गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर मनसेच्या जाहीर सभेची चर्चा आजपर्यंत सुरु आहे. त्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा विषय विशेष चर्चेला आला, त्यानंतर या भूमिकेवर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केलेली नाराजी सोशल मीडियातही चांगलीच चर्चेला आली. त्यामुळे राज ठाकरे यांनी ठाण्यात या सर्व चर्चांना पूर्ण विराम देण्याच्या हेतूने उत्तरसभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्याही सभेची चर्चा सुरु झाली आहे. सोमवारी, १२ एप्रिल रोजी ही सभा होत आहे आणि त्या सभेत राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाच्या आधी मनसे नेते वसंत मोरे यांना आधी भाषण करू द्यावे, अशी सूचना केली आहे.
गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांच्या भाषणाच्या आधी ज्या पदाधिकाऱ्यांना भाषण करायला लावले, ते पदाधिकारीही चर्चेत आले होते, आता उत्तर सभेत राज ठाकरे यांच्या भाषणात आधी वसंत मोरे यांना भाषण करायला द्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाण्यातील सभेत पुण्याचा सन्मान करण्यात येणार आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर मोरे यांना पुण्याच्या प्रमुख पदावरून हटवले. तेव्हापासून मोरे चर्चेत आले होते. राज ठाकरे यांनी यामाध्यमातून कणखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, असे स्पष्ट झाले होते, त्यावर मोरे यांची नाराजी चर्चेत आली होती.

राज ठाकरेंचा आदेश

आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर वसंत मोरे उत्तरसभेच्या आदल्या दिवशी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे येऊन भेट घेतली. जवळपास दीड तास वसंत मोरे यांच्याशी चर्चा केली. तुझी जी काही भूमिका होती ती थेट मला सांगायची होतीस. तू मीडियात कशाला गेलास?, झालं ते जाऊ दे…तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या उत्तर सभेत मिळतील, असे राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सांगितले. शिवाय मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी सूचना देताना वसंत मोरेंना उत्तर सभेत भाषण करु दे, असे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले वसंत मोरे?

राज ठाकरे यांची भेट घेऊन मी समाधानी आहे. माझ्या मनात जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे मला आजच्या सभेत मिळतील. मी आणि साईनाथ बाबर राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यातून निघालो आहे. सहा वाजता ठाण्यात पोहचेन. तिथे गेल्यानंतर पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेईन. नंतर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे भाषण देखील करेन, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

सलग १५ वर्षे मनसेचे नगरसेवक! 

वसंत मोरे मागील १५ वर्षांपासून पुण्यात मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर निवडून येतात. स्थायी समिती सदस्य, गटनेते म्हणून त्यांनी पुणे महापालिकेत काम पाहिले आहे. त्यांची पुण्यात लोकप्रिय नगरसेवक म्हणून ओळख आहे. गोरगरिबांचा वाली, दीनांच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.