महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व राष्ट्रीय मानांकन सुधरवावे, राज्यपालांचे प्रतिपादन 

142

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाविद्यालयीन स्वायत्ततेचा पुरस्कार करणारे आहे. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे गुणवत्ता वाढविणे सुलभ होते. यास्तव राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व आपले राष्ट्रीय मानांकन सुधरवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यास मदत  

कांदिवली शिक्षण संस्थेच्या बी के श्रॉफ कला व एम एच श्रॉफ वाणिज्य महाविद्यालयाला क्यू.एस.आय. गेज संस्थेचे सुवर्ण मानांकन प्रमाणपत्र राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवीनता, इन्क्युबेशन यांसोबत सोबत प्रादेशिक भाषांमधील शिक्षणाला महत्व दिले गेले असल्याचे सांगून राज्यातील महाविद्यालयांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले तर त्यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती व भाषेचा स्वाभिमान वाढेल व राष्ट्रीय एकात्मता देखील वृद्धिंगत होण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्तम इंग्रजी भाषा अवश्य शिकावी परंतु माता, मातृभाषा व मातृभूमीला विसरू नये असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – भारताने घेतली ‘हेलिना’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी)

क्यू.एस.आय. गेज ही खासगी गुणांकन संस्था

कार्यक्रमाला आमदार योगेश सागर, संस्थेचे अध्यक्ष सतिश दत्तानी, उपाध्यक्ष महेश शाह, क्यू.एस.आय. गेज रँकिंग संस्थेचे विभागीय संचालक अश्विन फर्नांडिस, महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्या डॉ लिली भूषण, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.  क्यू.एस.आय. गेज सुवर्ण मानांकन प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करताना श्रॉफ महाविद्यालयाने आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले. क्यू.एस.आय. गेज ही शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांचे गुणांकन करणारी खासगी गुणांकन संस्था आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.