उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा – राजेश टोपे

151

राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर परिणाम होऊन उष्माघाताचे प्रमाण वाढू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. वातावरणातील बदल व मानवी जीवन यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आयुक्त रामास्वामी एन. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

( हेही वाचा : चाकरमान्यांनो गणपतीक गावाक जातास? मगे याच महिन्यापासून करा बुकींग )

प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातील वाढत्या तापमानामुळे उष्माघात, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभाग आणि हवामान खात्याने योग्य समन्वय राखून माहितीचे आदान-प्रदान करावे. उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. जनजागृती करावी. आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, हवामान खाते आदी विभागांनी सतर्क राहून समन्वय ठेवावा, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

उष्माघातावर उपाय

  • वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
  • कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
  • उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे कपडे) वापरू नयेत.
  • सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
  • जलसंजीवनीचा वापर करावा.
  • पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.
  • उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम करणे थांबवावे.
  • उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा उपरणेचा वापर करावा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.