मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्याला शरद पवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. एखादी व्यक्ती वर्ष सहा महिन्यांत एखादे वक्तव्य करते, तेव्हा त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
वृत्तपत्र वाचण्यासाठी सकाळी उठावं लागतं
शिवाजी महाराजांचं नाव मी घेत नाही, असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. दोन दिवसांपूर्वी मी अमरावतीत होतो. त्यावेळी मी शिवाजी महाराजांच्या योगदानाबद्दल 25 मिनिटं भाषण केलं, अनेक गोष्टी त्यात मी सांगितल्या. सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचायची मला सवय आहे, त्यासाठी मला लवकर उठावं लागतं. त्यामुळे सकाळी लवकर वृत्तपत्र न वाचता जर कोणी असं वक्तव्य करत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
(हेही वाचाः सुळे, पाटील, भुजबळ, पवार; राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राज ठाकरेंचा ‘वार’)
शाहू, फुले, आंबेडकरांचा उल्लेख म्हणजे…
शाहू, फुले, आंबेडकर यांचाच उल्लेख मी करतो असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. या राज्यात शिवछत्रपतींचं सविस्तर वृत्त काव्याच्या माध्यमातून जर कोणी लिहिलं असेल, तर ते महात्मा फुले यांनी लिहिलं आहे. त्यामुळे फुले, आंबेडकर, शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आस्था असलेली व्यक्तिमत्व आहेत. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच त्यांनी आपलं कार्य केलं आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं हा छत्रपतींच्याच विचारांची मांडणी करण्याचा भाग आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.
बाबासाहेबांचा विरोध का केला?
बाबासाहेब पुरंदरे यांचा मी विरोध केल्याचं मी लपवून ठेवत नाही. शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व जिजाऊंनी घडवलं असं सांगण्याऐवजी महाराजांना घडवण्यात दादोजी कोंडदेव यांचं योगदान असल्याचं पुरंदरे यांनी म्हटलं आहे. त्याला माझा स्पष्ट विरोध होता. शिवाजी महाराजांना घडवण्यात जर कोणाचं योगदान असेल तर ते राजमाता जिजाऊंचं आहे, हे पुरंदरे यांना मान्य नसल्याने मी त्यांच्यावर टीका केली होती, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आणि अशा टीकेचं मला दुःख नाही तर अभिमान वाटतो, असं देखील पवार म्हणाले.
(हेही वाचाः ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)
काँग्रेसबाबत माझी भूमिका पहिल्यापासून स्पष्ट
काँग्रेससोबत न राहण्याची माझी भूमिका मी दोन दिवसांत बदलली अशी त्यांनी माझ्यावर टीका केली. सोनिया गांधींनी या देशाचं पंतप्रधान होऊ नये, हे माझी पहिल्यापासून जाहीर भूमिका होती. पण त्यांनी स्वतःहून मी सत्तेच्या शिखरावर जाऊन पंतप्रधान होऊ इच्छित नाही, असं त्यांनी सांगितल्यानंतर प्रश्न संपला होता. माझी भूमिका ही काँग्रेस किंवा सोनिया गांधी यांच्या विरोधात नव्हती तर पंतप्रधान पदाबाबत जी चर्चा होती त्यासंदर्भात होती. पण त्या चर्चेला स्वतः सोनिया गांधींनी पूर्णविराम दिल्यानंतर आमच्यात वादाचा विषयच उरला नाही. त्यामुळे नंतर आम्ही एकत्र आलो, आजही आहोत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
संपवणा-या पक्षाची मतदारांनी नोंद घेतली
आज राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. सामान्य माणसाच्या सुख-दुःखासंबंधी राज ठाकरे काहीही बोलत नाहीत. ज्या पद्धतीने भाजप देशात राज्य करत आहे त्यावर राज ठाकरे काहीच बोलले नाहीत, त्यामुळे त्या भाषणाबद्दल अधिक बोलण्याचं कारण नाही. आमचा पक्ष हा संपणारा नाही तर संपवणारा पक्ष आहे असं देखील ते म्हणाले. पण त्यांच्या या विधानाची दखल राज्यातील मतदारांनी घेतली. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळाली नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या ‘या’ दोन मागण्या)
Join Our WhatsApp Community