मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तरसभेत संजय राऊत यांचा उल्लेख पत्रावळीतील द्रोण असा केल्यानंतर आज त्या द्रोणमध्ये राष्ट्रवादीची आमटी पडली असेल, म्हणून तो राष्ट्रवादीच्या दिशेने कलंडला आहे. ते स्वतः सांगतात की, मी स्वतः राष्ट्रवादीचा माणूस आहे, ते स्वतः राष्ट्रवादीचा भोंगा आहेत. बाळासाहेब अल्टिमेटम का द्यायचे, कारण त्यांच्याकडे निष्ठावंत शिवसैनिकांची फौज होती, त्यांना विश्वास होता की, हा शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या शब्दाखातर रस्त्यावर उतरेल, उद्धव ठाकरे का अल्टिमेटम देऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे संजय राऊत यांच्यासारख्या लवंडे शिवसैनिकांची फौज आहे. राज ठाकरेच अल्टिमेटम देऊ शकतात कारण आमच्याकडे महाराष्ट्र सैनिकांसारखी निष्ठावंतांची फौज आहे. ज्यांच्याकडे निष्ठावंतांची फौज असते तेच अल्टिमेटम देऊ शकतात, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुलगी आणि पुतण्या यांच्यात फरक असतोच
उत्तरसभेनंतर बुधवारी, १३ एप्रिल रोजी पुन्हा राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली, याला देशपांडे यांनी सडेतोड उत्तरे दिली. सुप्रिया सुळे या संसदेत महागाई, पेट्रोलबद्दल बोलत नाही, यावर आम्हीच बोलायचे का आणि महापालिकेतील पैसे, जमिनी तुम्ही लाटायच्या. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवला? तुमची काम फक्त पैसे खायचे आणि आवाज आम्ही उठवायचा का? अजित पवार यांच्या घरावर कारवाई झाली, पण सुप्रिया सुळे यांच्या घरावर झाली नाही, शेवटी मुलगी आणि पुतण्या यांच्यात फरक असतोच. रक्त हे जास्त गडद असते, अशी म्हण आहे तोच हा प्रकार आहे, म्हणून छापेमारी फक्त अजित पवार यांच्याच घरावर झाली. उत्तरसभेत राज ठाकरे यांनी जे सडेतोड भाषण केले, त्यामुळे सगळ्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली, म्हणून आता त्यावर असंबंध वक्तव्य त्यांच्याकडून केली जात आहेत, असेही देशपांडे म्हणाले.
(हेही वाचा मराठी शाळांची वाताहत, मदरशांवर मात्र खैरात, उद्धवा अजब तुझे सरकार!)
आधी भोंग्यांवर कारवाई करा
तलवार काढून दाखवली म्हणून गुन्हा दाखल झाला, हा काय गुन्हा आहे का? शिवाजी पार्कात अनेक सभा झाल्या, त्यात तलवारी दाखवल्या गेल्या, आदित्य ठाकरे यांचे लॉन्चिंग झाले तेव्हाही त्यांच्या हातात तलवार दिली होती, मग मागील ४ वर्षांपूर्वीच्या घटनेचा संदर्भ काढून गुन्हा दाखल करणार का, जिथे पाहिजे तिथे कारवाई करत नाही आणि जिथे नको तिथे कारवाई करत आहे. आधी भोंग्यांवर कारवाई करा मग तलवारीवर कारवाई करा, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा ‘फक्त अजित पवारांच्याच घरी छापा का, एकेक आत जाण्यातही पवारांचा हात नाही ना?’)
शरद पवार जातीयवादीच
मशिदींवरील भोंग्यांसाठी ३ मे चा अल्टिमेटम दिला आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सांगितला आहे. कायद्याचे पालन करायला लावणे यात चुकीचे काय आहे. शरद पवार यांनी ते जातीयवादी आहेत, यावर उत्तर का दिले नाही. जेव्हा छत्रपती संभाजी यांना भाजपने खासदारकी दिली तेव्हा शरद पवार म्हणाले होते की, पूर्वी छत्रपती हे पेशव्यांना वस्त्र द्यायचे आता पेशवे छत्रपतींना वस्त्र देत आहे, हे वक्तव्य दोन जातींमध्ये भांडणे लावण्यासारखे नाही का?, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)
Join Our WhatsApp Community