पुणे शहरात आणखी दोन ‘ई-बस’ डेपोंची भर

141

देशातील पहिला ‘ई-बस’ डेपो साकारणारे ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पीएमपी) आता आणखी दोन ‘ई-बस’ डेपोची उभारणी करणार आहे. पुणे स्टेशन डेपो आणि निगडी डेपोअंतर्गत असलेल्या भक्ती-शक्ती डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘ई-बस’च्या सेवेचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.

‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या २९० ‘ई-बस’

‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या २९० ‘ई-बस’ आहेत. येत्या तीन महिन्यात उर्वरित बस दाखल होऊन ही संख्या ६५० वर जाणार आहे. ‘पीएमपी’ने ‘ई-बस’ पुरवठादार कंपनीला बसचा पुरवठा निर्धारित मुदतीत करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर या बससाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुरवठादार कंपनीला डेपोंचे हस्तांतरणही केला आहे. त्यामध्ये वाघोली, पुणे स्टेशन आणि भक्ती-शक्ती येथे संबंधित कंपन्यांकडून कामही हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांनी दिली.

(हेही वाचा – पुणे परिवहनमध्ये १०० टक्के ग्रीन बस!)

‘ई-बस’ डेपोसाठी ‘महावितरण’ला उपकेंद्र उभारावे लागणार

बाणेर येथील ‘ई-बस’ डेपोसाठी ‘महावितरण’ला उपकेंद्र उभारावे लागणार आहे. मात्र, जागेचा अडसर असल्याने सात किलोमीटर अंतरावर उच्चदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. सध्या निगडी डेपोअंतर्गत निगडी आणि भक्ती-शक्ती येथून बस संचालन केले जाते. त्यामध्ये निगडी येथून सीएनजी बसचे संचलन आणि भक्ती-शक्ती येथून केवळ ‘ई-बस’चे संचालन केले जाणार आहे. त्यासाठी भक्ती-शक्ती येथे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. पुणे स्टेशन डेपो पूर्णत: ‘ई-बस’साठी विकसित केले जाणार आहे. वाघोली बस डेपो येथे चार्जिंग पॉइंट उभारले जाणार असून, त्यासाठी १४ किलोमीटरवरून उच्चदाब वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. ‘महावितरण’ने त्याचे कामही सुरू केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.