उत्तरसभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

131
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाल्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्याच दिवशी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण ८ जणांवर कारवाई 

राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली, त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाली, त्यामध्ये त्यांना महाराष्ट्र सैनिकांनी तलवार दिली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ एप्रिल २०२२ रोजी गडकरी चौक, गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते, या जाहीर सभेदरम्यान अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार दाखवली म्हणून पोलीस ठाण्याच्या अभिलॆखावर १०४/२२ भा.द.वि कायदा कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ व २५ प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा पोलीस ठाणे संजय धुमाळ यांनी केली.

आधी भोंग्यांवर कारवाई करा 

यावर बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, तलवार काढून दाखवली म्हणून गुन्हा दाखल झाला, हा काय गुन्हा आहे का? शिवाजी पार्कात अनेक सभा झाल्या, त्यात तलवारी दाखवल्या गेल्या, आदित्य ठाकरे यांचे लॉन्चिंग झाले तेव्हाही त्यांच्या हातात तलवार दिली होती, मग मागील ४ वर्षांपूर्वीच्या घटनेचा संदर्भ काढून गुन्हा दाखल करणार का, जिथे पाहिजे तिथे कारवाई करत नाही आणि जिथे नको तिथे कारवाई करत आहे. आधी भोंग्यांवर कारवाई करा मग तलवारीवर कारवाई करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.