नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यानंतर भाजपची महापालिका आयुक्तांकडे ही मागणी

145

मुंबईतील नालेसफाईचे काम दरवर्षीपेक्षा १५ दिवस उशिराने सुरु केले असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा नाल्यातील गाळ काढण्याचे परिमाण हे निम्मेच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गाळ निम्मा काढला जाणार आणि कालावधीही कमी आहे, मग मागील वर्षी पेक्षा ३२ टक्के अधिक का मोजले जात आहे असा सवाल करत भाजपचे नेते आणि आमदार ऍड आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या कामे योग्यप्रकारे होण्यासाठी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र तीन टास्क फोर्स निर्माण करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

अत्यंत भयावह चित्र

भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहात भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईतील नालेसफाईची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान जे भयावह चित्र समोर आले. त्याचा सचित्र अहवाल आज पालिका आयुक्तांना सादर करून त्यांच्याशी भाजपाने सविस्तर चर्चाही केली. यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी, नालेसफाई पाहणी दौऱ्यादरम्यान अत्यंत भयावह चित्र समोर आल्याचे सांगितले आहे. आज पर्यंत १०टक्के पेक्षा जास्त काम झालेले नाही. गेल्या वर्षी १७ मे रोजी वादळी वाऱ्यासह तौक्ते वादळ आले होते व मुंबई ची ‘तुंबई’ झाली होती. यावर्षीही लवकर पावसाळा येण्याची शक्यता हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खूप कमी वेळ हाती शिल्लक आहेत.

जी.पी.एस. यंत्रणा बसवावी अशी मागणी

भांडूप येथील एपीआय नाल्यामध्ये कल्वर्टचे काम अर्धवट असून ते पूर्ण झाले नाही तर रेल्वे ट्रॅकवर मध्ये पाणी घुसेलच, शिवाय भांडूप परिसर जलमय होऊन जाईल, अशी भीती वर्तवली आहे. बॉम्बे ऑक्सिजन नाल्यामध्ये उभारलेल्या तटरक्षक भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह अडला गेला आहे असे अजब प्रकार संपूर्ण शहरात पहायला मिळत आहेत. बहुतांश ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही. गाळ कुठे टाकणार त्यावर लक्ष कोण ठेवणार ? त्याचे वजन कसे करणार ? असे प्रश्न प्रशासनाला विचारले असता अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी अकलेचे तारे तोडून गाळ घेऊन जाणाऱ्या गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. हि सिस्टीम तर दरवर्षीच असते तरीही भ्रष्टाचार होतो. त्यामुळे आता सनदी अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्षात मैदानात उतरावे, मुंबईकरांची सेवा करावी, कामांवर लक्ष ठेवावे आणि गाळाच्या गाड्यांसोबत अतिरिक्त आयुक्तांच्या गाड्यांनाही जी.पी.एस. यंत्रणा बसवावी अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे शेलार यांनी सांगितले.

New Project 3 12

नालेसफाई करताना मुंबईच्या नाल्यातून २०२० साली ३ लाख ५६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. गतवर्षी २०२१ साली ४ लाख ३६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी मात्र केवळ २ लाख ५२ हजार क्युबिक मीटर म्हणजे ५० टक्के गाळ काढण्याचे कंत्राट दिलेले आहे ! याचा अर्थ काय ? यावर्षी एवढा कमी गाळ कशासाठी काढला जातोय ? यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार वाढणार नाहीत काय ? काही कंत्राटदारांना गतवर्षीच दोन वर्षाची कामे देण्यात आली त्यामुळे तुलनात्मक यावर्षी गाळाची टक्केवारी कमी दिसते असे अतिरिक्त आयुक्तांनी या शिष्टमंडळांना सांगितले. मग गाळ कमी आणि खर्च ३२ कोटींनी अधिक वाढला कसा कसे ? ही नालेसफाई आहे कि महापालिकेच्या तिजोरीची सफाई असा सवाल शेलार यांनी यावेळी केला. ज्या पद्धतीने कलानगर जंक्शनला पाणी तुंबत नाही त्या पद्धतीने मुंबईत कुठेही पाणी तुंबू नये अशी व्यवस्था आणि साफसफाई करा असा टोलाही शेलार यांनी लगावला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासू हे उपस्थित होते. आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भेटलेल्या या शिष्ठ मंडळामध्ये महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, मनपा भाजपचे माजी पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर, उज्वला मोडक, नगरसेवक महादेव शिवगण आदींचा सहभाग होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.