मुंबई उच्च न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत सर्व संपकरी एसटी कर्मचा-यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. यानुसार आता न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी सोमवारी 18 एप्रिलला कामावर रुजू होणार आहेत. मागच्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी हे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर होते.
पाच महिन्यांहून अधिक कालावधीसाठी सुरु असलेला एसटी कर्मचा-यांचा बंद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून मागे घेण्यात आला आहे. बुधवारी 51 कर्मचारी नव्याने हजर झाल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली.
महत्त्वाचे मुद्दे
- एसटी कर्माचा-यांच्या कोअर कमिटीची बैठक
- वैद्यकीय तपासणीबाबत ठोस निर्णय द्यावा
- 60 कर्मचा-यांचा अपील अर्ज
- एसटी बंद पाच महिने 10 दिवस
असा आहे घटनाक्रम
- दिनांक 8 नोव्हेंबर 2021 उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, महामंडळातील कर्मचा-यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावे. या बाबीसाठी सर्वांकश विचार करुन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसह अहवाल सादर करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली.
- सदर तीन सदस्यीय समितीने महामंडळाच्या विविध 23 संघटनांच्या प्रतिनिधींचे व महामंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन आपला अहवाल दिनांक 25 फेब्रुवारी,2022 रोजी न्यायालयात सादर केला.
- समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने राज्य शासनाने महामंडळातील सर्व कर्मचा-यांच्या वेतनाची हमी घेतली आहे
- कोरोनाच्या महामारीमुळे राज्यामध्ये अनेकांचे प्राण गेले आहेत. महामंडळातील 308 कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, शासन निकषामध्ये बसणा-या कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 50 लाखांची मदत महामंडळाने केली असून, इतर मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 5 लाखांची मदत महामंडळाने केली आहे.
- मयत कर्माचा-यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी अथवा रुपये 10 लाखांची आर्थिक मदत देण्याची कार्यवाही महामंडळाकडून सुरु आहे.