गेले साडेपाच महिने एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सुरू असून, ते बेमुदत संपावर गेले आहेत. हा संप प्रदीर्घ काळ लांबल्याने एसटी कर्मचा-यांचे मोठे नुकसान आहेत. गेले अनेक महिने एसटी कर्मचारी पगाराविना राहत असल्यामुळे कर्जाचे हप्ते थकून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. आता उच्च न्यायालयाने कर्मचा-यांना कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम दिले आहे. पण राज्य सरकारला एसटी कर्मचा-यांची दया कधी येणार, कधी ते आमच्या मागण्या मान्य करणार, असा सवाल आता कर्मचारी करत आहेत.
लाखोंचे नुकसान
संपात सहभागी झालेल्या असंख्य कर्मचा-यांचे विविध कारणांमुळे सुमारे 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रत्येक कर्मचा-याला साधारणपणे 1 ते 4 लाख रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती एसटी कर्मचा-यांनी काही वृत्तपत्रांना दिली आहे. अनेक कर्मचा-यांचे वर्षातील हजेरीचे 240 दिवस देखील पूर्ण झाले नसल्यामुळे त्यांना या वर्षीची ग्रॅच्युएटी देखील मिळणार नसून, त्यांच्या पीएफ खात्यात पाच महिन्यांचे व्याज देखील जमा होणार नाही. त्यामुळे आता कामावर रुजू झाल्यानंतर सुद्धा झालेले नुकसान भरुन येणार नसल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
आर्थिक सहाय्य करण्याची मागणी
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मान्य झालेल्या मागण्या या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे कर्मचा-यांना फार मोठी आर्थिक झळ बसणार आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून काहीतरी आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community