मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तरसभेत मशिदींवरील भोंग्यांचा विषय पुन्हा चर्चेत आणला, तसेच मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. आता या अल्टिमेटमची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याविषयी महत्वपूर्ण भाष्य केले आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात अशांत वातावरण निर्माण करून देणार नाही. त्यासाठी पोलीस सज्ज आहेत, असा इशारा दिला.
मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असे म्हटले आहे. ज्याठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, ते काढण्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयाच्या निकालात याबाबत कोणताही उल्लेख नाही, या गोष्टीकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत. आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. पोलीस सज्ज असल्यामुळे कोणताही तणावाची परिस्थिती उद्भवणार नाही, अशा आशावादही दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा संपामुळे एसटी कर्मचारी झाले कर्जबाजारी, सरकारला दया येणार कधी?)
न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर गृहमंत्र्यांचे भाष्य
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळत आहे, यापूर्वी राऊत यांनी किरीट सोमय्या यांना न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिल्यानंतर ‘दिलासा घोटाळा’ असे ट्विट केले होते. गृहमंत्री वळसे-पाटील यांनीही कुठेतरी या भूमिकेचे समर्थन केले. विशिष्ट पक्षाच्या लोकांना दिलासा मिळत असेल तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community