मुंबईतील नालेसफाईच्या कामांच्या पाहणीनंतर नालेसफाईला सुरुवात न होणे, गाळ काढणे, नाल्यातील भिंत कोसळून पडणे आदी बाबींचा अहवाल भाजपने आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केल्यानंतर अगदी त्याच दिवशी उपायुक्तांच्या अखत्यारित भरारी पथके नेमत तसेच त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पाहणी दौरा आयोजित केला. या दोन्ही बाबींचा विचार करता आयुक्त तथा चहल हे भाजपच्या मागे धावत असल्याचे दिसून येत आहे.
( हेही वाचा : यंदा ९९ टक्के पाऊस; मान्सूनचा अंदाज जाहीर )
भाजपच्या पाहणी दौऱ्याला यश
मुंबईतील नालेसफाईच्या दौऱ्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सचित्र अहवाल दिला. या अहवालांमध्ये त्यांनी नालेसफाईच्या कामांमध्ये होत असलेली दिरंगाई तसेच त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र, नालेसफाईचे प्रस्तावच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंजूर झाले, त्यामुळे सफाईच्या कामांना योग्यप्रकारे सुरुवातही झालेली नाही. अशापरिस्थितीत भाजपने केलेल्या मागणीनंतर परिमंडळ उपायुक्तांच्या अखत्यारित भरारी पथक नेमणूक करण्याचे निर्देश देत एकप्रकारे भाजपची मागणी मान्य केली. यामध्ये भाजपच्या पाहणी दौऱ्याला यश आले हे निश्चित झाले.
भाजपला खूश ठेवण्याचा प्रयत्न
परंतु नालेसफाईच्या कामांना जेव्हा सुरुवातच झाली नाही तिथे भाजपने केलेल्या पाहणीनंतर आयुक्तांनी गुरुवारी पाहणी करूनही भाजपच्या दौऱ्यामुळे प्रशासन घाबरल्याचे दाखवून दिले. नालेसफाईच्या कामांना सुरुवात होत असल्याने पुढील २५ एप्रिलपर्यंत आपण स्वत: नालेसफाईच्या कामांची पाहणी करून त्यानंतर विरोधकांच्या तक्रारींचे निवारण झाले की नाही याचा आढाव घेऊ असे सांगणे आयुक्तांना अपेक्षित होते. परंतु पाहणी दौरा आयोजित करून आयुक्तांनी भाजपच्या सेवा सप्ताहालाच यश संपादन करून दिले. आयुक्तांनी गुरुवारी पाहणी केल्यामुळे भाजपच्या पाहणीनंतर आयुक्तांना रस्त्यावर उतरावे लागले असे चित्र निर्माण झाले आणि ते भाजपच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळे भाजपने मागणी केल्यानंतर त्वरीत त्याप्रमाणे निर्णय घेत आयुक्त हे भाजपलाही खूश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना विरोधकांनी काही तक्रारी केल्या असल्या तरी त्यावर आम्ही भाष्य करू इच्छित नाही, आम्ही आमचे काम कशाप्रकारे नियोजित वेळ पूर्ण होईल याचा विचार करू असे सांगितले. तर विरोधकांनी केलेल्या तक्रारी योग्य आहेत, आम्ही त्यांचीही दखल घेऊन अशाप्रकारेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली. त्यामुळे भाजपच्या केवळ एका पाहणी दौऱ्यानंतर जे काही विदारक चित्र समोर आणले त्यामुळे प्रशासन बिथरले असून पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सफाईचे काम सुरु होण्याआधीच त्यांनी कामांच्या पाहणीला सुरुवात केली, ज्यामुळे प्रशासन हे भाजपच्या पाठी धावत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
Join Our WhatsApp Community