वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून संतापलेल्या सासऱ्याने सुनेवर गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील राबोडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून या घटनेनंतर फरार झालेल्या सासऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या कार्डने आता करा मेट्रो-रेल्वे प्रवास! हे कार्ड कुठे मिळणार, किंमत किती? )
गोळीबारात मृत्यू
सीमा पाटील (४२) असे या गोळीबारात मृत्यू झालेल्या सुनेचे नाव असून काशिनाथ पाटील (७४) असे सासऱ्याचे नाव आहे. ठाण्यातील राबोडी येथील कुटुंब ऋतू पार्क विहंग शांतीवन या इमारतीत काशिनाथ पाटील हे दोन मुले सुना आणि पत्नीसह राहण्यास होते. काशिनाथ हे बांधकाम व्यवसायिक होते, त्याचा व्यवसाय त्याची मुले सांभाळत आहे, बांधकाम व्यवसायिक असल्यामुळे काशिनाथ पाटील यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्वर होते. काशिनाथ हे तापट स्वभावाचे होते. त्यांचे पत्नीसह दोन्ही सुनांबरोबर वारंवार खटके उडत होते. काशिनाथ हे सुनांची नेहमी नातेवाईकांकडे सुनांची नेहमी बदनामी करीत असे, सुना मला जेवण देत नाही, नाश्ता देत नाही म्हणून बदनामी करीत होते.
उपचारादरम्यान मृत्यू
गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काशिनाथ पाटील यांना वेळेवर नाश्ता मिळाला नाही, म्हणून ते संतापले आणि संतापाच्या भरात त्यांनी त्याच्याजवळील परवाना असलेली रिव्हॉल्वर काढून मोठा मुलगा राजेंद्र यांची पत्नी सीमा यांच्या पोटात गोळी झाडली, या गोळीबारात जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्या ठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून या गोळीबारानंतर फरार झालेल्या सासऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community