मुंबईतील नालेसफाईच्या मुद्दयावरून भाजपने प्रशासनाला कोंडीत पकडल्यानंतर खुद्द महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल मिठी नदीतील सफाईची पाहणी केली. ही पाहणी सुरु असताना मिठी नदीच्या सांताक्रुझ येथील पात्रामध्ये मशिनच्या माध्यमातून पुन्हा नाल्यातच गाळ टाकण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून होत आहे. आयुक्त पाहणीसाठी येणार असल्याने घाईगडबडीत गाळ उपसणाऱ्या मशिन्स नदीत उतरवल्या गेल्या. पण गाळ बाहेर न फेकता नाल्यातच टाकला जात असल्याने आयुक्तांसमोरच कंत्राटदारांनी सफाई करत असल्याची नौटंकी केल्याचे चित्र पाहणी दौऱ्यात दिसून आले.
( हेही वाचा : बेस्टच्या कार्डने आता करा मेट्रो-रेल्वे प्रवास! हे कार्ड कुठे मिळणार, किंमत किती? )
मिठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नालेसफाईच्या पाहणी दरम्यान मिठी नदीच्या तीन ठिकाणी पाहणी केली. यावेळी कलिना येथील मिठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे. उत्तर भारतीय महासंघाच्या समोरील नदीच्या पात्रादरम्यान वाहतुकीचा रस्ता आणि नदीच्या दुसऱ्या बाजुला विद्यापीठाची जागा आहे. परंतु नाल्यामध्ये उतरवण्यात आलेल्या पंटूनमधील गाळ तिथेच टाकण्यात येत होता. हा गाळ घट्ट स्वरुपात असल्याने पाण्यातही तो गाळ दिसून येत होता. त्यामुळे पाहणीदरम्यान चहल यांनी या गाळाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मिठी नदीतून वाहून येणारा हा गाळ रासायनिक द्रव्यामुळे घट्ट बनत असल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात आले. मात्र, हा गाळ बाहेर काढण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने तो कुठे टाकला जातो याविषयी विचारणा केल्यानंतर नदीच्या पात्रातील गाळ बाहेर काढण्यात अडचणी येत असल्याची कैफियत मांडली.
आयुक्तांनी दिल्या सूचना
नदी पात्राच्या दुसऱ्या बाजुला मुंबई विद्यापीठाची जागा असून याठिकाणी पुलाच्या निर्माणाचे काम सुरु आहे. त्यामुळे पूल उभारणीच्या कंत्राटदाराच्या चौक्या उभारण्यात आल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपत्कालिन कायद्यानुसार ही जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी गाळ टाकण्याची व्यवस्था केली जावी अशाप्रकारच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना निर्देश देत विद्यापीठाला त्वरीत पत्र लिहून ही जागा गाळ टाकण्याकरता वापरात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सफाईची नौटंकी
त्यामुळे या मिठी नदीमधील काढण्यात येणारा गाळा यापूर्वी कुठे काढून ठेवण्यात येत होता,असा प्रश्न उपस्थित होत असून यंदा आयुक्त स्वत: तिथे गेल्यांनतर त्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी गाळ काढून ठेवण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आजवर या नदीच्या पात्रातील गाळ पोकलेन तसेच पंटूनच्या मदतीने गाळ बाहेर फेकला जातो. बीकेसीमध्ये ज्याप्रकारे शिल्ड पूशर मशिन्स आणि ड्रेझरचा वापर करण्यात येत होता, तशाप्रकारे मशिनरी वापरुन कलिना भागातील नदीच्या पात्रातील गाळ काढताना दिसत नसल्याने केवळ आयुक्तांसमारे सफाईची नौटंकी केली जात होती की काय असा प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये उपस्थित होत होता.
Join Our WhatsApp Community