सध्या तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक गरमीने हैराण झाले आहेत. घामामुळे अनेकवेळा त्वचारोगांच्या समस्या निर्माण होतात. त्वचारोगांवर बाम आणि कांद्याचा रस हा जालीम उपाय असल्याचा शोध अनेकांनी लावला आहे. या घरगुती उपायांसमोर त्वचारोगतज्ज्ञांनी अक्षरशः हात टेकले आहेत. कांद्याचा रस हा त्वचेवर येणाऱ्या रॅशेससाठी उपाय नसल्याचे त्वचारोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
उपचारांसाठी पुरेसा वेळ
या दिवसांत कित्येकांना रॅशेस आणि फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो. सतत घाम येत असल्याने कित्येकजण प्राथमिक उपाय झाल्यावर जेव्हा त्वचारोगाची गंभीरता वाढते तेव्हा, डॉक्टरांकडे धावा घेत असल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञांकडून दिली गेली. मात्र फंगल इन्फेक्शनवर झटपट उपाय करता येत नाही. त्यासाठी उपचारांसाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो, कित्येकदा फंगल इन्फेक्शनवर १५ दिवस किंवा त्याहूनही अधिक काळ उपचार सुरु राहतात, अशी माहिती वाशी येथील हिरानंदानी रुग्णालयाच्या डर्मेटॉलोजी आणि कॉस्मेटॉलोजी विभागाच्या डॉ किरण गोडसे यांनी दिली. कित्येकदा फंगल इन्फेक्शनवर डॉक्टरांचा सल्ला न घेता लावलेल्या रसायनांमुळे त्वचाही जळते, अशा केसेसचीही नोंद झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान तुम्हांला खूप काळ त्वचारोग होत असेल तर घरगुती उपाय हा जालीम उपाय ठरत नसल्याची माहिती शीव येथील टिळक रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाच्या प्रमुख डॉ रत्ना धुरत यांनी दिली. त्वचारोगावर तत्काळ उपचारांची गरज असते.
तत्काळ उपचारांची गरज
- रॅशेसची सुरुवात झाली असल्यास नारळाचे तेल उपायकारक ठरू शकते.
- तहान लागल्यावर पाणी प्या.
- सतत उन्हाच्या संपर्कात आल्यास केसही रुक्ष होतात. त्यामुळे दुपारच्या उन्हांत घराबाहेर पडताना डोके सुती कापडाने झाका किंवा टोपी घ्या.
- लहान मुलांमध्येही घामोळ्या किंवा उष्णतेमुळे टेंगूळ येते. या समस्यांवरही उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर्स सांगतात.