एसटीचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. पाच महिन्यानंतरही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतलेले नाहीत. मात्र आता हळूहळू कर्मचारी कामावर रूजू होत आहेत यामुळे एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
एसटी पूर्वपदावर
महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी ही राज्याची जीवनवाहिनी आहे. ग्रामीण भागातील प्रवासी मुख्यत: एसटीवर अवलंबून आहेत या सर्व नागरिकांना एसटी संपाची मोठ्या प्रमाणात झळ बसली आहे. आता मात्र एसटी हळूहळू पूर्वपदावर येत असून सात हजार गाड्या सुरू झाल्या आहेत.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. आजवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा ४५ हजारांवर पोहोचला आहे. सध्या संपूर्ण राज्यात जत्रांचा माहोल आहे याच पार्श्वभूमीवर गाड्यांची संख्या वाढवण्यात आली असून ७ हजार गाड्या सुरू आहेत. प्रवाशांचाही याला चांगला प्रतिसाद असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.
असा आहे घटनाक्रम
- दिनांक 8 नोव्हेंबर 2021 उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, महामंडळातील कर्मचा-यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावे. या बाबीसाठी सर्वांकश विचार करुन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसह अहवाल सादर करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली.
- सदर तीन सदस्यीय समितीने महामंडळाच्या विविध 23 संघटनांच्या प्रतिनिधींचे व महामंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन आपला अहवाल दिनांक 25 फेब्रुवारी,2022 रोजी न्यायालयात सादर केला.
- समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने राज्य शासनाने महामंडळातील सर्व कर्मचा-यांच्या वेतनाची हमी घेतली आहे.
- कोरोनाच्या महामारीमुळे राज्यामध्ये अनेकांचे प्राण गेले आहेत. महामंडळातील 308 कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, शासन निकषामध्ये बसणा-या कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 50 लाखांची मदत महामंडळाने केली असून, इतर मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 5 लाखांची मदत महामंडळाने केली आहे.
- कोविड काळात मृत्यू झालेल्या कर्माचा-यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी अथवा रुपये 10 लाखांची आर्थिक मदत देण्याची कार्यवाही महामंडळाकडून सुरु आहे.