कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकः मविआची वि‘जयश्री’, भाजप परा‘जीत’

101

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक ही महाविकास आघाडी आणि भाजपसाठी मोठी प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत मैदान मारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी दंड थोपटले होते. शनिवारी हाती आलेल्या निवडणूक निकालांनुसार, या लढाईत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मविआच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा दणक्यात पराभव केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीने सरशी केल्याचे समजत आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजप उमेवार सत्यजीत कदम यांचा तब्बल 18 हजार 800 मतांनी पराभव केला आहे. मतमोजणीच्या 26व्या फेरीअंती जाधव यांच्या पारड्यात एकूण 96 हजार 226 मते पडली आहेत. तर भाजपच्या कदमांना मात्र 77 हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे.

भाजपची ऑफर नाकारत विजय

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त झाली होती. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला होता. पण चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना भाजपने निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. पण जाधव यांनी भाजपची ऑफर नाकारत महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती.

भाजपवर टीका

या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांनी एकाच मंचावरुन प्रचार केला होता. त्यामुळे आता भाजपच्या पराभवानंतर मविआकडून टीका करण्यात येत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन ही निवडणूक लढवणा-या भाजपला जनेतेने दिलेले हे उत्तर आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील हे या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापूरात मविआकडून जल्लोष करण्यात येत आहे.

एक विरुद्ध तीन ची लढाई- पाटील

ही लढाई एकट्या भाजपविरुद्ध शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी होती. त्यामुळे तीन पक्षांनी एकत्र येऊन मिळालेला विजय हा काही खरा नाही. भाजपने स्वबळावर 77 हजार मतांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आम्ही समाधानी असून, जनतेने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.