सध्या महागाई आणि तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. वाढत्या उकाड्यामुळे थंडगार सरबत, शीतपेय, फळांचे रस यांची मागणी वाढली आहे. परंतु फळांचे भाव वधारल्याने आता फळांचे रस सुद्धा महागले आहेत. २५ रुपयांना मिळणारा मोसंबी रस आता ४५ रुपयांच्या दरात विकला जात आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही
गेल्या महिन्यामध्ये मोसंबीचे दर ५० ते ६० किलो होते परंतु या आठवड्यात मोसंबीचे दर ८० रुपये किलो झाले असून दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे फळरस विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. लिंबाचे भाव वधारल्यामुळे ५ ते १० रुपयांच्या लिंबू सरबतासाठीही आता १५ रुपये तर संत्र्याच्या रसासाठी आता ४० रुपये मोजावे लागणार आहेत. उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असलेला ऊसाच्या रसाची किंमत सुद्धा २० रुपये झाली आहे.
मिल्कशेकही महाग
अलिकडे दूध सुद्धा २ ते ४ रुपयांनी महागल्यामुळे मिल्कशेकच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्यात ही दरवाढ झाल्यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
Join Our WhatsApp Community