मुंबईतील जुहू आणि वर्सोवा किनारपट्टीवर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डझनभरहून अधिक ऑलिव्ह रिडले कासवांचे मृतदेह आढळले आहेत. ९ एप्रिल रोजी गदा मासा (डॉल्फिन सदृश दिसणारा इंग्रजी भाषेतील पॉर्पोइज)ही मृतावस्थेत आढळला. सात ऑलिव्ह रिडले आणि एक गदा मासा जुहू आणि वर्सोवा किनारपट्टीवर आढळल्याने समुद्रातील मानवी हस्तक्षेपामुळे सागरी जीवांचा वाढता बळी आता दिसून येऊ लागला आहे.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
२ एप्रिल ते ९ एप्रिलपर्यंत आढळून आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. कित्येक कासवांचे अवयवही तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. काही ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीचा भागही तुटलेला होता. पोर्पोईज मासाही कुजलेल्या अवस्थेतच स्थानिकांना आढळून आला. ऑलिव्ह रिडले कासव आणि गदा माशाचा मृतदेह चौपाटीतच पुरल्याची माहिती वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून दिली गेली.
(हेही वाचाः चंद्रपुराचे तापमान पुन्हा जागतिक नोंदीत)
- २ एप्रिल रोजी पहिल्यांदा तीन ऑलिव्ह रिडले कासवांचा मृतदेह आढळला.
- ३ एप्रिल रोजी दुस-या दिवशी पुन्हा दोन ऑलिव्ह रिडले कासवांचा मृतदेह आढळला.
- सलग तिस-या दिवशी ४ एप्रिल रोजीही एक ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत आढळला.
- एका दिवसाच्या अंतराने ६ एप्रिलला पुन्हा एका ऑलिव्ह रिडले कासवाचा मृतदेह आढळून आला.
- ९ एप्रिल रोजी डॉल्फिन सदृश गदा माशाचा मृतदेह आढळला.
सध्याचे ऋतुमान ऑलिव्ह रिडले कासवांसाठी किनारपट्टीजवळ येत अंडी घालण्यासाठीचा आहे. त्यामुळे किनारपट्टीजवळच्या भागांत आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांना मानवी हस्तक्षेपाचा फटका बसत आहे. कित्येक ऑलिव्ह रिडले कासव मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून मरतात. काही कासवांचा, माशांचा जहाजाच्या धक्क्यानेही मृत्यू होतो. सध्या संपूर्ण किनारपट्टीवर आढळणा-या समुद्री जीवांच्या मृत्यूमागे हेच प्रमुख कारण आहे.
-स्वप्निल तांडेल, समुद्री जीवशास्त्रज्ञ
वर्सोव्यातील कांदळवनावरील अतिक्रमणही धोकादायक
वर्सोवा किना-यावर कांदळवनाची बेमुमार छाटणी करुन मोठी मानवी वस्तीच तयार झाली आहे. या झोपड्या जुहू किना-याच्या दिशेने वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांत या झोपड्या वाढतच चालल्या असून ही जागा वनविभागाच्या कांदळवनकक्षाच्या ताब्यात आहेत. या वस्त्यांमधील सांडपाणी थेट समुद्रात सोडले जाते. वर्सोवा किनारपट्टीवर दिवसेंदिवस दुर्गंधीही वाढत चालली आहे. समुद्राचा रंगही सांडपाण्यामुळे गडद होऊ लागला आहे.
(हेही वाचाः सॅटलाईट टॅग केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांपैकी वार्षिक हजेरी देणारी मादी सापडली)
अतिक्रमण काढण्यासाठी मुहूर्त मिळेना
अतिक्रमण काढण्यासाठी सर्व तयारी सुरु असून, पोलिसांचे मनुष्यबळ मिळाल्यानंतरच वर्सोव्यातील अतिक्रमण काढले जाईल, अशी माहिती कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.
पाण्याचे नमुने तपासण्याचा निर्णय
वाढत्या सांडपाण्याच्या मुद्द्यावर तसेच मोठ्या संख्येने ऑलिव्ह रिडले आणि गदा मासा मृतावस्थेत आढळल्यानंतर टीमसोबत चर्चा केल्यानंतर पाण्याचे नमुने तपासण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.
(हेही वाचाः सॅटलाईट टॅगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या स्वभावाचे पॅटर्न जाणून घ्या….)
Join Our WhatsApp Community