संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे थैमान सुरु असून, देशामध्ये २४ तासांमध्ये तब्बल ९७ हजार ५७० लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही वाढती आकडेवारी पाहता भारताने ब्राझिलला मागे टाकले आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये आता भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा ४६ लाखांवर पोहोचला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाममुळे गेल्या २४ तासांत १ हजार २०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण बघता देशात तासाला ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
देशातील आकडेवारी
संपूर्ण देशात ९ लाख ५८ हजार ३१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा देशातील आकडा ४६ लाखावर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत ७७,४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३६ लाख २४ हजार १९७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
असा आहे मृत्यूदर
भारताचा कोरोना मृत्यूदर हा १.७ टक्के असून, अमेरिकेमध्ये तो ३ टक्के तर ब्रिटनमध्ये ११.७ टक्के आणि इटलीमध्ये १२.६ टक्के आहे. भारतात यशस्वीपणे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भातातील रिकव्हरी रेट चांगला असला तर दिवसाला नवीन वाढणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
महाराष्ट्रातही रुग्ण वाढले
महाराष्ट्रमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, २४ तासांमध्ये राज्यात २४ हजार ८८६ रुग्णांची नोंद झाली असून, ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत १० लाख १५ हजार ६८१ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
भुजबळांचे कार्यालय आठवडाभर बंद
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून, कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community