शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातील शौचालय घोटाळा उघडकीस आणला. त्यामुळे हा घोटाळा चांगलाच चर्चेत आला. या प्रकरणी आता किरीट सोमय्या यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना पत्र लिहिले. त्यात हा प्रकल्प केव्हाचा आहे, याचा अजूनपर्यंत कोणी उल्लेख केला नाही, त्यासंबंधी एक कागदही दिला नाही. यासंबंधी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी उपरोक्त गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करावा, अभ्यास करावा, आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्हीही संबंधित माहिती द्यायला तयार आहोत, असे म्हटले आहे.
किरीट सोमय्यांच्या कुटुंबियांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असून लवकरच हा घोटाळा बाहेर काढण्यात येईल असे विधान दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते, त्यानंतर या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली बाजू मांडली आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी नगरविकास विभागाला एक पत्र लिहिले आहे. हा १०० कोटींचा आकडा आला कुठून असा सवालही उपस्थित केला.
(हेही वाचा रामनवमी आणि हनुमान जयंतीला झालेले हल्ले नियोजित… यावर पंतप्रधान गप्प का? राऊतांचा सवाल)
काय म्हटले सोमय्यांनी पत्रात?
- भाजप, युवक प्रतिष्ठान, प्रा. मेधा सोमय्या, डॉ. किरीट सोमय्या यांनी कोणताही अशा प्रकारचा शौचालय घोटाळा केला नाही, हे मी स्पष्ट करु इच्छितो.
- ज्या शौचालय घोटाळ्याची चर्चा सुरू आहे ती घटना केव्हा झाली हे अजूनपर्यंत कोणीही सांगितले नाही.
- गेल्या १० वर्षांत मीरा-भाईंदर महानगरपालिका किंवा पर्यांवरण मंत्रालय…यांच्याकडून शौचालय किंवा कांदळवन अशा प्रकारचा कोणताही विषय, पत्र, प्रश्न आलेला नाही.
- किंबहुना १५ वर्षांत अशा प्रकारचा विषय झालेला दिसत/आठवत नाही.
- एका बाजूला शौचालय संबंधी खोटी कागदपत्रे दाखवून ३ कोटी ९० लाख ५२ हजार रुपयांची बिले घेतली असा उल्लेख केला जातो. त्याचसोबत १०० कोटींचा घोटाळा याचाही उल्लेख होत असतो याची दखल घ्यावी व स्पष्टता करावी.