इंग्लंड – युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे 21 एप्रिल रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. यावेळी पंतप्रधान जॉन्सन यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल. 22 एप्रिल रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा, मंथन, सल्लामसलत करतील.
विचारांची देवाण-घेवाण होणार
पंतप्रधान बोरिस जॉन्सन 21 एप्रिलला गुजरातला भेट देणार आहेत. ‘भारत-युके मार्गदर्शक आराखडा 2030’ च्या अंमलबजावणीचा ते आढावा घेतील आणि द्विपक्षीय संबंध आणि इतर विषयांमध्ये सहकार्य अधिक घट्ट करण्यासाठी भूमिका स्पष्ट करतील.
भारत आपल्या मुद्द्यावर ठाम
मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली होती. यावेळी युक्रेनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. या परिस्थितीशी संबंधित देशांनी शत्रुत्व सोडून द्यावे आणि चर्चा तसेच राजकीय मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारावा या भारताने सतत लावून धरलेल्या मागणीचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय कायद्याविषयी भारताला असलेला आदर आणि सर्व देशांची प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्व हाच समकालीन जागतिक व्यवस्थेचा पाया आहे. यावर असलेल्या विश्वासाचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय हिताच्या मुद्यांबाबत चर्चा केली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसेच दोन्ही देशांतील जनतेचे परस्पर संबंध यांच्यासह अनेक विषयांबाबत सहकार्य अधिक दृढ करण्यास वाव आहे, यावर त्यांच्यात सहमती झाली. द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराबाबत सध्या सुरु असलेल्या वाटाघाटींना आलेल्या सकारात्मक वेगाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले.
( हेही वाचा: लोडशेंडींगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची महत्त्वाची माहिती, म्हणाले…)
दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या वर्षी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या ‘भारत-युके मार्गदर्शक आराखडा 2030’ च्या अंमलबजावणीत होत असलेल्या प्रगतीचीदेखील त्यांनी प्रशंसा केली.
Join Our WhatsApp Community