मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ भाभा या पालिका रुग्णालयाच्या आवारात मांडूळ बनवून विकल्या जाणा-या अजगराच्या अवैध तस्करीच्या घटनेमुळे राज्यभरात हादरा बसला होता. मांडूळ सदृश्य दिसण्यासाठी रंगरंगोटी केलेल्या तसेच शेपटीचा भाग कापलेल्या अजगराला चार महिन्यांच्या उपचारानंतर नुकतेच नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडण्यात आले. मात्र शेपटी कापल्याने अजगराला त्याचे लिंग गमवावे लागले. अजगर तस्करीतून सुखरुप सुटला असला तरीही त्याने आपली प्रजननक्षमता कायमची गमावल्याने प्राणीप्रेमींनी दुःख व्यक्त केले आहे.
नेमकी घटना काय?
अजगराची शेपूट कापून त्याला मांडूळ दिसण्यासाठी रंगकाम करुन कापलेला भाग धाग्याने शिवून विकले जात होते. हा प्रकार पोलिसांच्या प्रसंगावधानतेने उजेडात आला होता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली. त्यावेळी अजगराला वनविभागाच्या कार्यालयात घेऊन जाणा-या दोन प्राणीप्रेमींच्या झालेल्या अपघातावरही घातपाताची शक्यता वर्तवली गेली होती. वापरा या प्राणीप्रेमी संस्थेच्या प्राणीप्रेमींना अपघातात गंभीर जखमा झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. मात्र शेवटपर्यंत रुग्णवाहिकेत अजगराला ठेवणारे आरोपी कोणाच्याही हाती लागले नाहीत.
(हेही वाचा घराच्या अंगणी आला हा विचित्र पाहुणा)
अजगराला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
वनविभागाने जखमी अजगराला उपचारासाठी स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्लाईल्स एण्ड रिहेबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेच्या हवाली केले. सर्प या प्राणिप्रेमी संस्थेने त्याला खाणे भरवण्यापासून काळजी घेतली. अजगराच्या जखमांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा कट्याळ यांच्याकडे उपचार झाले. जखमांवर मलमपट्टी करण्यापासून ते एन्टीबायॉटीक व पेनकिलर्स औषधे अजगराला दिली गेली. तस्करीच्या दिवसांत अजगर तीन आठवडे अन्नपाण्याशिवाय होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया गरजेची असूनही सुरुवातीला अंगातील अशक्तपणा भरण्यासाठी खूप काळ गेल्याची माहिती डॉ. कट्याळ यांनी दिली. अजगर सर्प या संस्थेकडेच चार महिने निगराणीखाली राहिला. मात्र शरीराबाहेर आलेल्या लिंगामुळे त्याच्या हालचालींचा वेग मंदावला होता. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीराबाहेर आलेले लिंग कापून टाकले, असे डॉ. कट्याळ म्हणाल्या. अजगराच्या शरीरावरील जखमांमुळे झालेला संसर्ग पूर्णपणे बरा झाला आहे. शिवाय शस्त्रक्रियेच्या अगोदरच तो स्वतःहून भक्ष्य पकडून खाऊ लागला आहे, हे निरीक्षण नोंदवल्यानंतरच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली, अशी माहिती सर्पचे संतोष शिंदे यांनी दिली. तो आता परावलंबी नाही, म्हणूनच नैसर्गिक अधिवासात सोडल्याचेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community