राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये दुजाभाव करत आहे, असा आरोप होत होता. अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना झुकते माप देत आहेत, असा आरोप होत होता. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राष्ट्रवादीचे मंत्री, नेते शिवसेनेवर आरोप करू लागले आहेत. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
शिवसेनेच्या मंत्र्यांकडून सत्तेच्या बळाचा वापर करुन कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली जात आहे. शिवसेना मंत्र्यांच्या अशा वागणुकीवरुन राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीच्या औरंगाबादमधील कार्यक्रमात उघडपणे नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने युती धर्म पाळावा, असे मंत्री टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले, त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे फोडाफोडी करत आहेत. ते आमच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेऊन जात आहेत. तसेच या शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. यातही तथ्य आहे. म्हणून या विषयावरुन मी सत्तार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तेच्या बळावर फोडाफोडी करु नये, असे सांगणार आहे. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे राजेश टोपे म्हणाले.
(हेही वाचा महाराष्ट्र वाचू लागला, पुस्तक खपू लागले; राज ठाकरेंनी असे भाषणात काय सांगितले?)
या आधीही झालेले वाद
महाविकास आघाडीतील कुरबुरीची ही पहिली वेळ नाही. शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीवर महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही, असा आरोप झाला आहे. पारनेरच्या सात नरसेवकांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी रायगडमधील शिवसेनेच्या दोन आमदारांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात बंड थोपटले होते. त्याआधी बीडमध्ये शिवसैनिकांनी उपुमख्यमंत्री अजित पवारांना थेट काळे झेंडे दाखवले होते.
Join Our WhatsApp Community