पुनश्च: हरिओम म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा पुनश्च: ‘तोच’ संवाद

166

पुनश्च: हरिओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात घरात बसून, जनतेशी संवाद साधला. यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टिका देखील झाली. मात्र आज पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. पण त्यांचे हे सूपूर्ण फेसबुक लाईव्ह पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी पुनश्च: तोच संवाद साधला असे म्हणण्याची वेळ आली आहे. अनलॉक ४ सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांनंतर जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार त्यामुळे ते कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेल्या उपाययोजना सांगतील असे वाटले होते. मात्र मास्क वापरा, गर्दी करणे टाळा, एकमेकांशी बोलताना काळजी घ्या असे जुनेच सल्ले त्यांनी जनतेला दिले.

लोकप्रतिनिधींनी आपआपल्या विभागाची जबाबदारी घ्या 

पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोक मास्क चुकीच्या पद्धतीने घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीने पाळल्या पाहिजेत. मिशन बिगिन अगेनअंतर्गत काही गोष्टी सुरु केल्या आहेत. कार्यालयातील उपस्थिती वाढवत आहोत. वाहतुकीचे निर्बंध शिथिल केले आहेत. आयुष्याची गाडी मागावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत. आयुष्य पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.  तसेच फेस टु फेस बोलू नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ८० टक्के ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी योजना 

कोरोनाचे भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’ पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.

जे विकेल ते पिकेल योजना

शेतीमध्ये क्रांती करायची आहे. महाराष्ट्राची ‘प्रयोगशील राज्य’ ही ओळख आहे. आजपर्यंत जे ‘पिकेल ते विकेल’ होते, परंतु आता जे ‘विकेल ते पिकेल’ योजना आणत आहोत. हमी भाव नाही, आता हमखास भाव! असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. शेतकरी त्याच्या परिवारातील ‘बैल’ कारण तो त्याच्या परिवारातील सदस्यच असतो. त्याला बैल देखील गहाण टाकावा लागतो. म्हणून मी नवीन योजना आणत आहे. कुठेही उणीव न ठेवता सर्व आघाड्यांवर सरकार कार्यरत आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी अधिक उभे आहोत कारण शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्तांना १८ कोटींची मदत देण्याची घोषणा केली. विक्रमी कापूस उत्पादन झाले त्याची खरेदी केलेली आहे, महाराष्ट्रातील कुपोषित साडे सहा लाख बालकांना मोफत दुधफुकटी वाटप केले आहे, सव्वा लाख स्तनदा मातांना पण ही भुकटी मोफत देत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मराठ्यांनो आंदोलन करू नका’

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलने पुकारली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, जेष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत. तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. विरोधी पक्ष नेत्यांसोबतही मी आज बोललो आहे. ते आत्ता बिहारला आहेत. ते देखील म्हणाले आहेत की आम्ही सरकारसोबत आहोत. मोठ्या बेन्चकडे जायला परवानगी दिली त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. अनाकलनीय पद्धतीने आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली आहे. त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. ज्येष्ठ विधीतज्ञांसमवेत चर्चा करून सर्वोत्तम वकील दिले आहेत, असे ते म्हणाले. मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आपण एकत्र लढलो. सर्वपक्षीय एकत्र लढलो. पूर्वीच्या सरकारचे कोणतेही वकील बदलले नाहीत, उलट अधिक वकील दिले. कोर्टात आर्ग्युमेन्ट करायला कमी पडलो नाही, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.