लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे एप्रिल महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी सध्याचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करात सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी लष्करात विविध महत्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत.
नवे लष्करप्रमुख म्हणून निवड झालेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराचे दक्षिण मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांड सेंटरचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. यासोबतच लष्कराच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे मुळचे नागपूरचे आहेत. त्यांनी नॅशनल डिफेन्स अॅकेडमी तसेच राष्ट्रीय लष्करी अकादमीतून लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ३ मे १९८७ रोजी लष्करी सेवेला सुरुवात केली.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे माझे विद्यार्थी आहेत, त्यांना मी प्रशिक्षण दिले होते. लष्करप्रमुख पदावर त्यांची निवड होणे ही चांगली बाब आहे.– ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन
जनरल मनोज नरवणे सीडीएस?
निवृत्तीनंतर मनोज नरवणे यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे .पहिले चिफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्यावर हे पद रिक्त झाले आहे. मनोज नरवणे हे निवृत्त झाल्यावर त्यांची या पदी निवड हाेण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community