बेहराम पाड्याच्या ठिकाणी पाच पंचवीस झोपड्या या आपण लहान असताना होत्या, आता तर या ठिकाणी झोपड्याच उभ्या राहिल्या असून त्याही टोलेजंग. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या मातोश्रीच्या अंगणात हा प्रकार सूरु आहे. सत्ताधारी शिवसेनेला यावर कारवाई करता आलेली नाही, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कवरील गुढी पाडव्याच्या सभेत व्यक्त केली. परंतु बेहरामपाड्यानंतर गरीब नगर, नवपाडा अशा झोपडपट्टयांनंतर आता रेल्वेच्या जागेवर नवीन बेहरामपाडा, गरीब नगर वसले जात आहे. मात्र, रेल्वेकडेन यावर कारवाई केली जात नाही आणि महापालिकाही रेल्वेची जागा असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले, परंतु त्यांच्या मातोश्रीच्या अंगणात आणखी एक झोपडपट्टी निर्माण होत असून यावर कारवाई करण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही.
( हेही वाचा : गिरगावच्या ‘त्या’ प्रेक्षक गॅलरीचे रश्मी ठाकरे यांच्या हस्ते का झाले उदघाटन? )
रेल्वे रुळाच्या मध्ये गरीब नवाज नगर
वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारी चमडावाडी नाल्याला खेटून बेहरामपाडा वसला गेला. नाला व रस्त्याच्या मधल्या जागी नवपाडा वसला गेला. त्याबरोबरच रस्ता आणि रेल्वे रुळाच्या मध्ये गरीब नवाज नगर वसले. यातील बेहरामपाडा हा टोलेजंग झोपड्यांमुळे प्रसिध्द आहे. तर नवपाडा आणि गरीब नगर हे स्लम डॉग मिलेनियममधील बाल कलाकारांमुळे चर्चेत आले. विशेष म्हणजे बेहरामपाड्यात दोन वेळा आणि गरीब नगरलाही दोन वेळा मोठ्या प्रमाणात आग लागून त्यांच्या घरांचे नुकसान झाले. परंतु या आगीत कोणत्याही स्वरुपाची जिवितहानी झाली नाही.
रेल्वेच्यावतीने यावर कारवाई होणे अपेक्षित
बेहरामपाडा आणि नवपाडा येथील झोपड्यांमुळे चमडावाडी नाल्याचे काम रखडले होते. मागील चार वर्षांपासून हे काम झोपड्याअभावी रखडले होते. परंतु २०१९मध्ये नाल्यांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पात्र नसतानाही तात्पुरते पर्यायी घर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या तिन्ही झोपडपट्ट्या महापालिकेच्या व रेल्वेच्या कामांमध्ये अडचणी ठरत असताना दुसरीकडे जलवाहिनीच्या लगत दहा मिटर परिसरात बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला खेटून नव्याने झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. काही झोपडीदादांनी कच्च्या झोपड्या उभारल्या असून अलियावर जंग उड्डाणपूलापर्यंत म्हणजे होर्डींगच्या खांबापर्यंत या झोपड्या बांधल्या गेल्या आहेत. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही जागा रेल्वेची असून त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला नाही. त्यामुळे रेल्वेच्यावतीने यावर कारवाई होणे अपेक्षित मानले जाते. एका बाजूला रेल्वे प्रशासनाच्यावतीने त्यांच्या जमिनींवर वसलेल्या झोपडपट्टयांना तोडण्याबाबत नोटीस बजावत आहे, दुसरीकडे अशाप्रकारे नव्याने वसलेल्या झोपड्यांवर कारवाई करून वस्त्या वसल्या जाणार नाही याची काळजी घेताना रेल्वे प्रशासन दिसत नाही. त्यामुळे झोपड्या व्हाव्यात ही रेल्वे प्रशासनाची इच्छा आहे का असा प्रश्न स्थानिकांकडूनही केला जात आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. जिथे सुरक्षेचा मुद्दा नाही, तिथे सध्या कारवाई केली जात आहे. जिथे सुरक्षेची आवश्यकता आहे, तिथे सरकारची मदत घेऊन कारवाई केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community