मुंबईतील ही जंबो कोविड सेंटर कायमची बंद

169

जानेवारी महिन्यांमध्ये मुंबईतील ९ जंबो कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी ५००खाटा वाढवण्याचा प्रयत्न केला गेलेला असताना घटलेल्या रुग्ण संख्येमुळे आता कोविड सेंटरच बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता दहिसर चेकनाका, गोरेगाव नेस्को आणि कांजूर मार्ग हे तीन जंबो कोविड सेंटर ही पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. मात्र उर्वरीत बीकेसी,मालाड, वरळी एनएससीआय,मुलुंड या केंद्रामधील सेवा बंद राहतील, पण बांधकामे हटवली जाणार नाही. सर्व केंद्र ऍक्टीव्ह मोडवर ठेवली जाणार असून रुग्ण संख्येमध्ये वाढ झाल्यास कोणत्याही क्षणी या केंद्रांमधील उपचार सेवा सुविधा कार्यरत केल्या जातील अशाप्रकारची व्युहरचना आता महापालिकेने आखली असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : तिकीटासाठी ‘बेस्ट’चे बेस्ट पाऊल! )

मुंबईमध्ये सोमवारी ३४ नवीन रुग्ण आढळून आले असून सध्याच्या २६ हजार १४३ खाटांपैंकी ११ खाटांवरच रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी केलेल्या एकूण ७ हजार ०५९ चाचण्यांपैंकी ३४ नवीन रुग्ण आढळून आले होते. या सर्व रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. सध्या सीसीसी वनमध्येही एकही रुग्ण दाखल नाही. मात्र, ही रुग्णसंख्या कमी झाल्याने मागील आठवड्यात आपत्कालिन नियंत्रण कक्षातील सभागृह आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व कोविड सेंटरचे अधिष्ठाता व परिमंडळाचे उपायुक्त, संबंधित विभागांचे सहायक आयुक्त यांची आढावा बैठक आयोजित केली होती.

कोविड सेंटर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय

या आढावा बैठकीत दहिसर चेकनाका, गोरेगाव नेस्को(२२२१ खाटा) आणि कांजूरमार्ग(२००० खाटा) हे तीन कोविड सेंटर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी नेस्को गोरेगाव फेज दोन कायमस्वरुपी बंद करण्यात आले होते. सध्या सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा या दोन प्रमुख रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात असून त्याठिकाणी खाटा राखीव आहे. शिवाय भायखळा रिचडसन क्रुडास येथील सेवाही सुरु राहणार आहे.

या केंद्रांव्यतिरिक्त बीकेसी, मालाड, मुलुंड आणि वरळी एनएससीआय चार केंद्रांमधील सेवा सुविधा बंद ठेवल्या जाणार आहे. परंतु रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्यास आवश्यकतेनुसार पुन्हा ही केंद्र सुरु करता येईल अशाप्रकारे त्या ऍक्टीव मोडवर ठेवल्या जाणार आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी बांधकामे पाडली जाणार नाहीत.

महापालिका आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दहिसर, नेस्को आणि कांजूर या ठिकाणची कोविड सेंटर कायमस्वरुपी बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. इतर चार ठिकाणची सेवा बंद करण्यात येत असून आवश्यकतेनुसार ही केंद्र सुरु करण्यात येतील अशाप्रकारे राखीव ठेवण्यात आली असल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.