मुंबईतील सर्व दुकानांच्या मराठ्या पाट्या देवनागरी लिपित अर्थात ठळक मराठी अक्षरात लावण्याचे परिपत्रक जारी करण्यात आल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागाच्यावतीने प्रत्येक भागाचे स्थळ निरिक्षण केले जाणार आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर या प्रत्यक्ष स्थळ निरिक्षण मोहिमेला सुरुवात केले जाणार आहे. मात्र, मराठी पाट्यांची कार्यवाही दुकान व आस्थापने विभागाच्या माध्यमातून होणार असली तरी प्रत्यक्षात या विभागाकडे मनुष्यबळच उपलब्ध नसून हे विभाग कशाप्रकारे ही कारवाई करणार असा प्रश्नच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
( हेही वाचा : तिकीटासाठी ‘बेस्ट’चे बेस्ट पाऊल! )
मराठी भाषेत पाट्या
मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत सुवाच्य अक्षरात आणि ठळक लावण्याचा निर्णय राज्य कॅबिनेट बैठकीत १२ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आला. परंतु दोन महिने झाले तरी याबाबतचा शासन आदेश मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांना जारी करण्यात आला नव्हता. त्यामुळे याची अंमलबजावणी महापालिकांना करता येत नव्हती. परंतु याचा अध्यादेश २३ मार्च २०२२ रोजी महापालिकेला प्राप्त झाला असून त्यात मराठीतील पाट्यांसह महान व्यक्तीची नावे तसेच गड किल्ल्यांची नावे दारूचे दुकान किंवा बार यांना देण्यात येऊ नये असे म्हटले आहे.
त्यामुळे याबाबत आता मुंबई महापालिकेच्यावतीने दुकाने व आस्थापना विभागाच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार असून या परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याचे आदेश प्राप्त व्हावेत यासाठी या विभागाने आयुक्त तथा प्रशासक यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार आयुक्तांच्या मान्यतेनंतर दुकाने व आस्थापना विभाग पुढील कार्यवाही करणार आहे.
आयुक्तांची परवानगीची आवश्यकता
मुंबईतील दुकानांच्या पाट्या केवळ ठळक मोठ्या अक्षरातच नाही, तर देवदेवतांची व गड किल्ल्यांची नावेही हटवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे आजवर अशाप्रकारची कारवाई महापालिकेच्या संबंधित सहायक आयुक्तांच्या खांद्यावर टाकली जात असे, परंतु ही कार्यवाही दुकान व आस्थापने विभागाच्या माध्यमातून होणार आहे. मात्र, ईज ऑफ डुईंग बिजनेसमुळे दुकाने व आस्थापना विभागांचे सर्व परवाने ऑनलाईन झाल्याने येथील कर्मचाऱ्यांना परवाना विभागात वळवण्यात आले. त्यामुळे या विभागाकडे कर्मचारीच नसून पुन्हा परवाना विभागाकडे असलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावण्याची वेळ आली आहे. मात्र, हे कर्मचारी न आल्यास दुकाने व आस्थापना विभागाला अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही कारवाई करता येणार नाही, अशी भीती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
या विभागाचे उपायुक्त संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांची परवानगीची आवश्यकता आहे. ही परवानगी प्राप्त झाल्यानंतर मराठी पाट्यांवरील कार्यवाहीसाठी टीम बनवून स्थळ निरिक्षण केले जाईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community