तिसऱ्या आघाडीचा २०१९मध्ये फसलेला प्रयोग २०२४ला पुन्हा होणार!

158
भाजपाला पर्याय म्हणून लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस वगळता देशभरातील सर्व विरोधक एकत्र आले आणि तिसरी आघाडी उभी केली होती, मात्र त्यावेळीही नरेंद्र मोदी यांची जादू इतकी होती की, या निवडणुकीत २०१४च्याही तुलनेत भरघोस यश भाजपाला मिळाले. आता २०२४मध्ये भाजपाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: केले.

लवकरच बैठक 

महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याच्या उद्देशाने शरद पवार कर्नाटकातील बेंगळुरू येथे सोमवारी पोहचले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पवारांच्या या दौऱ्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी देशपातळीवर भाजप विरोधी आघाडी उभारण्याबाबत खूप मोठे विधान केले. भाजपच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आम्हाला तसे लेखी कळवले आहे. याचा पुढाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. इतर नेत्यांशी बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख अद्याप ठरलेली नाही, असे पवार यांनी नमूद केले.

शिवसेनेचे नक्की नाही!

त्याआधीच राज्यभरातील १३ प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षरी करून एक संयुक्त निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. देशात सध्या जो हिंसाचार सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर हे निवेदन होते, त्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, एनसीपी अध्यक्ष शरद पवार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, एम के स्टॅलिन, सोरेन या प्रमुख नेत्यांची स्वाक्षरी होती, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली नव्हती, त्यामुळे या भाजपविरोधी आघाडीत शिवसेनेची एन्ट्री होते का नाही, याविषयी शंकास्पद वातावरण आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.