धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा गृहमंत्र्यांचा इशारा

160

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेऊन, विरोधी पक्षावर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात दंगे पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचेही दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटना, व्यक्तींवर कठोर कारवाई करणार असल्याचा  इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे

केंद्र सरकार दोषींना सुरक्षा पुरवत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा देण्याचा अधिकार संबंधित राज्याचा आहे, मात्र या प्रकरणात केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहे. दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यातील कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा देण्यासाठी गृह विभागाची समिती आहे. ही समिती राज्यातील कोणत्याही व्यक्तीकडून आलेल्या धमकीचा अभ्यास करून त्याला संरक्षण देण्याचा निर्णय घेते. मात्र केंद्र सरकार समितीच्या शिफारशीशिवाय राज्यातील कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा देत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अधिकारांवर परिणाम होत आहे.

( हेही वाचा: चेंबूरमध्ये भाजपाच्या पोलखोल सभेच्या रथाची तोडफोड! )

पोलीस यंत्रणा सज्ज

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिळालेल्या धमकीबाबत राज्य सरकारची समिती कार्यरत आहे. राज ठाकरे यांना मिळालेल्या धमक्यांचा सखोल अभ्यास करून ही समिती त्यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेणार आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, धार्मिक उन्माद निर्माण करून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची झलक महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती घेणार आहेत. महाराष्ट्रात 4 ठिकाणी असा प्रयत्न करण्यात आला होता, पण पोलिसांनी लगेचच हाणून पाडला. अशाप्रकारे तणाव निर्माण करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि सर्व प्रकारे सतर्क असल्याचेही दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.