देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना आता आणखी एक धक्का दिला आहे. एसबीआयने आपल्या होम लोन आणि कार लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे 15 एप्रिलपासून सुधारित व्याजदर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियाचे होम लोन आणि कार लोन महाग झाले आहे. याचे कारण म्हणजे एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) वर घेतलेल्या सर्व मुदत कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ केली आहे.
(हेही वाचा – मनसेचं ठरलं! शिवतीर्थावरील राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय; काय म्हणाले नांदगावकर?)
जाणून घ्या किती वाढले दर
बँकेच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये एमसीएलआरमध्ये ही वाढ 15 एप्रिलपासून लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बँकेने होम लोनचे दर वाढवल्याने याचा मोठा फटका हा नव्याने होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे. व्याज दर वाढीमुळे ईएमआयच्या हफ्त्यात देखील वाढ होणार आहे. बँकेने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR 6.65 टक्क्यांवरून 6.75 टक्के केला आहे. त्याच वेळी, MCLR सहा महिन्यांसाठी 6.95 टक्क्यांवरून 7.05 टक्के करण्यात आला आहे.
एका वर्षासाठी नवीन MCLR
देशातील सर्वात मोठ्या कर्जदाराने एक वर्षाचा MCLR 7 टक्क्यांवरून 7.10 टक्के केला आहे. दोन वर्षांचा MCLR 7.20 टक्क्यांवरून 7.30 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 7.30 टक्क्यांवरून 7.40 टक्के करण्यात आला आहे. होम लोन आणि कार लोन महागल्याने आता ग्राहकांना घर आणि गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विविध बँकांकडून-व्याज दरात वाढ करण्यात येत असल्याने महागाईत भर पडत असल्याचे समोर आले आहे.
बँक ऑफ बडोदाकडून व्याज दरात वाढ
दरम्यान दुसरीकडे बँक ऑफ बडोदाकडून देखील MEER पर 0.05 टक्के व्याज दराची वाढ करण्यात आली आहे. नवे दर 12 एप्रिलपासून लागू झाल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. बँकेकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार एक वर्षाच्या MCLR ला वाढवून 7.35 टक्के करण्यात आले आहे. यासोबतच अनेक बँकांनी पर्सनल लोनवरील व्याज दर देखील वाढवले आहेत. सध्या अनेक बँकांकडून पर्लनल होनवर अव्वाच्या सव्वा कर्ज आकारले जात आहे.