इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अशीही काढण्यात आली एक वरात!

105

लग्नानंतर नववधूला कोणी बुलेट वरून, कोणी हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपातून आपल्या घरापर्यंत घेऊन गेल्याचे उदाहरणे आहेत. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. या इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यासाठी निफाड तालुक्यातील देवगांव येथे चक्क नवदांपत्य लग्नानंतर सजविलेल्या बैलगाडीतून लग्नमंडपातून घरापर्यंत पाच ते सहा किलोमीटरचे अंतर कापत गेले.

इंधन दरवाढीने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे

निफाड तालुक्यातील देवगाव येथील सचिन निकम आणि नाशिक येथील नांदुर गावातील कोमल राजेंद्र शिंगवे यांचा देवगाव येथे मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला. पण  इंधनाच्या दरात दररोज वाढ होत इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशात अनेकांनी नववधूची पाठवणी हेलिकॉप्टरमधून केल्याचे उदाहरण पाहिले आहे.

( हेही वाचा: एकाच दिवसात एसटीचे तब्बल एवढे कर्मचारी झाले कामावर रुजू ! )

अशी निघाली अनोखी वरात

आता या वाढत्या इंधनाच्या दरामुळे बुलेटवरून नववधूची पाठवणी करणे अवघड होऊन बसल्यामुळे लग्नानंतर रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सचिन निकम याने सजवलेल्या बैलगाडीतून नववधू कोमलसहित बैलाचा कासरा हातात धरत सर्जा-राजाच्या साक्षी देवगाव येथून निकम वस्तीपर्यंत पाच ते सहा किलोमीटर प्रवास केला. या वधू-वरांचे अनेकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. अनेकांनी हे क्षण शूटिंग करत आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले, तर काहींनी सोशल मीडियावर व्हायरल केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.