कोरोना महामारीत कोरोनाशी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विमा योजनेला आणखी सहा महिन्यांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) कोविड-19 शी लढा देणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचार्यांसाठी ‘विमा योजना’ 19 एप्रिल 2022 पासून आणखी 180 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. कोरोना रूग्णांच्या सेवेत अहोरात्र झटलेल्या आरोग्य कर्मचार्यांच्या कुटुंबियांना संरक्षण कवच प्रदान करण्यासाठी सरकारने या धोरणाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
19 एप्रिल 2022 पासून योजनेला मुदतवाढ
प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (PMGKP) आणलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या विमा योजना आणखी 180 दिवसांसाठी म्हणजेच 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. 19 एप्रिल 2022 पासून या विमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. कोविडच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना याची मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अतिरिक्त आरोग्य सचिवांनी हे परिपत्रक काढले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही या योजनेला मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
(हेही वाचा – भारतच नाही तर ‘हे’ देशही करताहेत धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी! )
अशी आहे PMGKP योजना
30 मार्च 2020 रोजी PMGKP ही विमा योजना लॉन्च करण्यात आली होती. यामध्ये सर्वसमावेशक 50 लाखांचा वैयक्तिक अपघात विम्याचा लाभ देण्यात आला आहे. 22.12 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार होता. यामध्ये कम्युनिटी आरोग्य कर्मचारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही योजना लागू झाल्यापासून आत्तापर्यंत 1905 आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून या सर्वांचे विमा दावे निकाली काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Join Our WhatsApp Community